मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
वैद्यकीय क्षेत्रात मालेगाव शहराने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अनेक वर्षांपासून असह्य वेदना सहन करणाऱ्या २५ वर्षीय सनी निकम या तरुणाच्या शरीरातील तब्बल ७० मिमी आकाराची व सुमारे ४०० ग्रॅम वजनाची भलीमोठी खडा-पत्री येथील एका खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढून त्याला नवजीवन दिले आहे.
रुग्णाच्या तपासणीत शरीरात अत्यंत मोठ्या आकाराची खडा-पत्री असल्याचे निदान झाले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अदनान हिंदुस्तानवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही जिकिरीची शस्त्रक्रिया १३ जून रोजी यशस्वीरीत्या पार पाडली.
शस्त्रक्रियेपूर्वी विविध वैद्यकीय तपासण्या, आवश्यक नियोजन आणि तज्ज्ञांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे अवघड ऑपरेशन यशस्वी झाले. शस्त्रक्रियेनंतर सनी निकम यांची प्रकृती उत्तम असून, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा उमटलेले हास्य डॉक्टरांच्या अथक परिश्रमांचे फलित ठरले आहे.
या शस्त्रक्रियेत डॉ. निखिल निकम, डॉ. स्वाती लोया, डॉ. शरद शिंदे, डॉ. विजय गांगुर्डे आणि डॉ. चंद्रशेखर शेवाळे यांनी मोलाचे योगदान दिले. एकेकाळी अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा नाशिकसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती.
मात्र आज मालेगावातील डॉक्टरांचे ज्ञान, अनुभव आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा यामुळे अशक्य वाटणाऱ्या शस्त्रक्रियाही यशस्वीरीत्या पार पडत आहेत. सनी निकम यांच्या उपचाराचे यश हे केवळ एका रुग्णाला मिळालेले नवजीवन नसून मालेगावच्या वाढत्या वैद्यकीय सामर्थ्याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.