मालेगाव : शिर्डी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या परराज्यातील दोघांचे स्थानिक टोळीने अपहरण केले होते. या दोघांची सुटका करून, पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात तालुका पोलीसांना यश आले आहे. अपहरण झालेले दोघे ओरीसा राज्यातील आहेत. त्यांना एका हॉटेमध्ये डांबून ठेवले होते. यावेळी पोलिसांनी कार, मोबाईल, रोख रक्कमेसह साडेसात लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे.
टीपी प्रसाद राजू व त्याचा मित्र जलंदर पोडाल ( दोघे रा. पुकाली जिल्हा कोरापूट, ओरिसा) हे दोघे शिर्डी येथे दर्शनासाठी जात होते. दोघांचे मेहूणे यांचा येथील तरुणांशी सन २०२० मधील पैशांचे परतफेडीचा विषय होता. यातून धुळे टोल नाका येथून ९ ऑक्टोबरला दोघांचे अपहरण करण्यात आले. संशयीतांनी दोघांना मनमाड कौळाणे रस्त्यावरील हॉटेल विशाल मध्ये डांबून ठेवले. ऑनलाइन व्यवहारातून त्यांच्याकडून जबरदस्तीने चाळीस हजार रुपये वसूल केले. तीस हजाराचे दोन मोबाईल काढून घेतले. तसेच या दोघांची सुमारे साडेसात लाखांची किया कॅरन्स कार ( ओडी १० डब्ल्यु २६८३) जबरदस्तीने ताब्यात घेतली.
तालुका पोलिसांना याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, पोलीस उपअधीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, दामोदर काळे हवालदार रतिलाल वाघ अमोल शिंदे आदींच्या पथकाने विशाल हॉटेलवर छापा टाकून समाधान निंबा देवरे (३४) रोशन शिवाजी अहिरे (२१) सोमनाथ रवींद्र अहिरे (२२) गणेश गोविंद मेंडायत (२४) शिवम कैलास पैठणकर (२२, सर्व रा. मेहूणे) यांना अटक करून दोघांची सुटका केली. तालुका पोलीस ठाण्यात या पाच जणांविरुद्ध अपहरण व जबरदस्तीने खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.