मालेगाव (नाशिक) : भिक्कू चौकात 2008 ला झालेल्या बॉम्बस्फोटाचा निकाल देताना एनआयए न्यायालयाने मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही मदत मंजूर केली.
या बॉम्बस्फोटात घटनास्थळीच सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर काही जण जखमी झाले होते. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करत पोलिसांना लक्ष्य केले होते. यात पाच पोलिस अधिकारी, 47 पोलिस कर्मचारी व 23 होमगार्डही जखमी झाले होते.
यावेळी शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून स्फोटातील मृतांच्या वारसांना प्रारंभी पाच लाखांची मदत दिली. तत्कालीन सहायक पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह एक निरीक्षक व तिघा उपनिरीक्षकांनाही मदत मिळाली होती. गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये वाटप केले होते. किरकोळ जखमींना तत्काळ उपचारासाठी पाच हजार, तर नंतर 25 हजार रुपये दिले होते. असे एक कोटी चार लाख 85 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.
31 जुलै 2025 ला तब्बल 17 वर्षांनी बॉम्बस्फोटाचा निकाल लागला. प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता झाली. निकालात न्यायालयाने मृतांच्या वारसांना दोन लाख व जखमींना प्रत्येकी 50 हजार देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मदत मंजूर झाली आहे.