Malegaon Bomb Blast Pudhari News Network
नाशिक

Malegaon Bomb Blast | मग खरे गुन्हेगार कोण?

मालेगाव बॉम्बस्फोट निकाल : पीडित कुटुंबियांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

  • मालेगाव शहराच्या पूर्व भागातील अत्यंत वर्दळीच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी बाॅम्बस्फोट झाला

  • भिक्कू चौकात फ्रीडम ब्रँडच्या दुचाकीच्या डिकीत स्फोटक ठेवलेला बॉम्ब होता

  • निकालात संशयितांना निर्दोष मुक्त केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा आनंदोत्सव

मालेगाव : प्रमोद सावंत

This incident, which occurred during the holy month of Ramadan, in a religious atmosphere, caused a stir.

शहराच्या पूर्व भागातील अत्यंत वर्दळीच्या भिक्कू चौकात २९ सप्टेंबर २००८ रोजी बाॅम्बस्फोट झाला. या घटनेत सहा जण ठार, तर १०१ जण जखमी झाले. रमजानच्या पवित्र महिन्यात, धार्मिक वातावरण असताना घडलेला हा प्रकार खळबळजनक ठरला. घटनेच्या ठिकाणाजवळच, सुमारे १०० मीटर अंतरावर नुराणी मस्जिद असून, लागूनच पवार गल्लीतील महिलांचा बाजारही आहे. जर हा स्फोट या भागात झाला असता, तर जीवितहानीचे प्रमाण अधिक गंभीर असते. मस्जिद टार्गेट असावी, मात्र रमजानमधील वाढलेली गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त यामुळे हे उद्दिष्ट अयशस्वी ठरल्याची चर्चा झाली होती.

भिक्कू चौकात फ्रीडम ब्रँडच्या दुचाकीच्या डिकीत स्फोटक ठेवलेला बॉम्ब होता. स्फोटाची तीव्रता कमी असल्याने सुरुवातीला गॅस सिलिंडरच्या स्फोटाची अफवा पसरली. मात्र, खरी बाब उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी सुमारे २० हजारांचा जमाव जमला. संतप्त जमावाने त्यावेळचे सहाय्यक पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. या मारहाणीत प्रभू गंभीर जखमी झाले आणि त्यांना खासगी रुग्णालयात अनेक दिवस उपचार घ्यावे लागलेत.

या घटनेचा तपास प्रारंभी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासाबद्दल समाधान व्यक्त करत पूर्व शहरवासीयांनी भिक्कू चौकाचे नामकरण ‘शहीद हेमंत करकरे चौक’ असे केले.

तपासाचा अंतिम टप्पा राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आला. या प्रकरणावरील निकाल गुरुवारी (दि. ३१) जाहीर झाला. निकालात संशयितांना निर्दोष मुक्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी मोसमपूल चौकात आनंदोत्सव साजरा केला. मात्र, शहराच्या पूर्व भागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले जाणार असल्याचे पीडितांचे नातेवाईक आणि मुस्लिम संघटनांनी स्पष्ट केले. ‘जर हे संशयित निर्दोष आहेत, तर खरे गुन्हेगार कोण?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी ‘हमें न्याय चाहिए’ अशी मागणी केली.

मालेगाव बॉम्बस्फोट घटनाक्रम अन‌् संदर्भ

  • २९ सप्टेंबर २००८ : रात्री ९.२७ ला भिक्कू चौकात बॉम्बस्फोटात सहा ठार, बंदी घातलेल्या सिमी संघटनेच्या कार्यालयाखाली एलएमएल फ्रीडम दुचाकीत बॉम्ब ठेवला होता. (गुजरातमध्ये मोदासा येथेही याचदरम्यान बॉम्बस्फोट : पोलिसांचा प्रथम सिमी आणि इंडियन मुजाहिदीनवर संशय. मात्र दुचाकीची पाहणी केली असता, इंजिन व चेसीस क्रमांक गायब केल्याचे उघड)

  • ३० सप्टेंबर २००८ : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • ऑक्टोबर २००८ : तपास ‘एटीएस’कडे सुपूर्द.

  • तपासामध्ये हिंदू जागरण मंचावर पोलिसांचा संशय, दुचाकी तपासामध्ये हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग समोर.

  • १० ऑक्टोबर : साध्वी प्रज्ञासिंगला अटक, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी हिंदू संघटनांनी बॉम्बस्फोट घडविल्याचा दहशतवादविरोधी पथकाचा आरोप.

  • बाँबस्फोटात अभिनव भारत संस्थेचे नाव. संशयितांत कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय यांची नावे आल्याने खळबळ.

  • १८ ऑक्टोबर २००८ : बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा

  • शिवनारायण कलसंग्रा, शाम साहू, रमेश उपाध्यायला अटक (अभिनव भारत संघटनेचे पदाधिकारी).

  • २१ ऑक्टोबर २००८ : 'एटीएस'कडून दोषारोपपत्र दाखल दोषारोपपत्रात १४ संशयित; ११ अटक, ३ फरारी

  • १७ नोव्हेंबर : मोक्कानुसार कारवाई.

  • १८ नोव्हेंबर : राकेश धावडेवर नांदेड व नाशिक बॉम्बस्फोटाचा आरोप.

  • २२ जानेवारी २००९ : मोक्का न्यायालयात ४५२८ पानांचे आरोपपत्र.

  • २०११ : 'एटीएस'कडून पुरवणी आरोपपत्र दाखल

  • मे २०१६ : ‘एनआयए’ने आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सहा जणांना वगळले

  • १३ मे २०१६ : गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्धचा मोक्का रद्द.

  • १२ संशयितांपैकी ५ जण फरार.

  • १९ एप्रिल २०२५ ला सुनावणी संपली .

  • सुनावणीदरम्यान ३२३ साक्षीदारांचे साक्षी पुरावे नोंदविले.

  • ३४ साक्षीदार फितूर झाले.

  • ३१ जुलै २०२५ खटल्यातील सर्व सात संशयितांची निर्दोष मुक्तता.

Nashik Latest News

बाॅम्बस्फोटातील संशयित असे...

  • साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

  • लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित

  • मेजर रमेश उपाध्याय

  • सुधाकर चर्तुवेदी

  • मधुकर द्विवेदी ऊर्फ दयानंद पांडे

  • जगदीश म्हात्रे

  • श्याम साहू

  • राकेश भावडे

  • शिवनारायण कलसंग्रा

  • समीर कुलकर्णी

  • प्रवीण मुतालिक

  • अजय राहीरकर

  • (फरारी संशयित आरोपी : संदीप डांगे, रामचंद्र ऊर्फ रामजी कलसंग्रा)

  • ‘एटीएस’च्या तपासातील काही संशयित ‘एनआयए’च्या तपासात वगळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT