लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याला यंदा बाजारात सोन्यासारखा भाव मिळू लागला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याने गेल्या १० वर्षातील उच्चांकी दराची नोंद करत प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. मात्र बाजारभावात झालेली ही वाढ मक्याच्या घटलेल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांसाठी फारशी दिलासादायक ठरत नसल्याचे चित्र आहे.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने महाराष्ट्रसह कर्नाटक, तमिलनाडु आणि आंध्र प्रदेश या प्रमुख मका उत्पादक राज्यांमधील उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात मक्याचा पुरवठा कमी झाला आहे.
दुसरीकडे पोल्ट्री उद्योग तसेच इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांकडून मक्याला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होताना दिसत असल्याचे व्यापारी नंदकुमार डागा यांनी सांगितले.
मागील वर्षी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला जास्तीत जास्त २ हजार ३०१ रुपये, कमीत कमी ७०० रुपये, तर सरासरी १ हजार ८५१ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला होता.
यंदा मात्र मक्याच्या दरात मोठी सुधारणा झाली असून, जास्तीत जास्त ३ हजार रुपये, कमीत कमी २ हजार १०१ रुपये, तर सरासरी २ हजार ९२१ रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मक्याच्या कमाल बाजारभावात ७०० रुपयांची, तर सरासरी बाजारभावात तब्बल १ हजार ७० रुपयांची प्रतिक्विंटल वाढ झाली आहे.