येवला : शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हे ॲप शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये फार्मर आयडी किंवा मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करून देताना सहायक कृषी अधिकारी संतोष गोसावी. Pudhari News Network
नाशिक

Mahavistar App : महाविस्तार ॲप वापरामध्ये राज्यात अंदरसूल प्रथम

नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

पुढारी वृत्तसेवा

येवला (नाशिक) : महाविस्तार एआय ॲप कृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या मोबाइलमध्ये फार्मर आयडी किंवा मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करून देत आहे. राज्यात अहिल्यानगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, तर नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक असून, येवला तालुक्यातील अंदरसूल हे गाव महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची शेतकऱ्यांना सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी हे अत्याधुनिक एआय आधारित ॲप विकसित करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा ॲप डाउनलोड करत प्रत्यक्ष शेतीसाठी योग्य वापर करण्यात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल गावात ७८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यामुळे राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

हवामानातील अनिश्चितता, बाजार भावातील चढउतार आणि तांत्रिक माहितीचा अभाव अशा तिहेरी समस्यांशी राज्यातील शेतकरी रोज लढत आहेत. कृषी विभागाने आधुनिक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना मातीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व आवश्यक माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळण्यासाठी 'महाविस्तार' हे अत्याधुनिक एआय आधारित ॲप विकसित केले आहे. त्यामुळे आता शेती संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागणार नाही. या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी भाषेतील चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. विचारलेली माहिती संदर्भासह अचूक मिळते. त्याचबरोबर वाचता न येणाऱ्या शेतकऱ्यांना आवाजाच्या रूपाने सर्व माहिती ऐकायला मिळते. शेतीविषयक माहितीसाठी हे ॲप सर्वांसाठी उपयुक्त आहे.

शेतकऱ्यांनी रोजच्या शेतीकामांत कोणकोणत्या बाबी कराव्यात, हे या ॲपच्या माध्यमातून समजत आहे. उत्पन्न निघाल्यावर त्यांचा विक्रीचा विषय महत्त्वाचा आहे. कोणत्या बाजार समितीत काय भाव आहे, आपला शेतमाल विक्री करावा की नाही, हे चॅटबॉटच्या माध्यमातून समजत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी टाकून नोंदणी केली आहे. त्याआधारे शेतीसंबंधी माहिती घेत आहेत.

कसे आहे महाविस्तार ॲप

हे ॲप शेतकऱ्यांसाठी 'वन स्टॉप सोल्युशन' म्हणून काम करणार आहे. याचा अर्थ, शेती संबंधित कोणतीही माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी फिरावे लागणार नाही. या ॲपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी भाषेतील चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या समस्या किंवा शंका यांचे निरसन करायचे असल्यास ते मजकूर किंवा आवाजाद्वारे थेट चॅटबॉटशी संवाद साधू शकतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्गदर्शक म्हणून केवळ काही सेकंदांत अचूक सल्ला उपलब्ध करून देईल.

--

कोट

अंदरसूल गावात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड केले आहे. ॲपमधील 'मला प्रश्न विचारा' या टॅबचा वापर शेतकरी करत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा.

-संतोष गोसावी, अंदरसूल, सहायक कृषी अधिकारी

-

शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागते. महाविस्तार ॲप अचूक आणि योग्य सल्लागार म्हणून काम करत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक अचूक माहिती मिळत आहे.

-उज्ज्वल जाधव, शेतकरी, अंदरसूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT