Grape Pudhari
नाशिक

Mahashivratri Grape | महाशिवरात्र 'द्राक्ष दिन' उपक्रमास केंद्राचे पेटंट

Mahashivratri Grape | यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी आणि द्राक्ष सेवनाला धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची जोड देण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीतर्फे चार वर्षांपासून महाशिवरात्रीच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या द्राक्ष दिन उपक्रमास भारत सरकारकडून पेटंटमान्यता प्राप्त झाली आहे.

या मान्यतेमुळे उपक्रमास अधिकृत स्वरूप प्राप्त झाल्याने उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाशिवरात्रीस भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, पिंडीवर वाहणे आणि प्रसाद म्हणून द्राक्ष सेवन करण्याची संकल्पना या उपक्रमातून मांडण्यात आली. रुद्राक्षामधील रु अक्षर काढल्यास द्राक्ष हा शब्द तयार होतो. या श्रद्धापूर्ण भावनेतून उपक्रम सुरू करण्यात आल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.

महाशिवरात्रीस द्राक्षांचा हंगाम असतो. त्यामुळे देशभरातील महादेव मंदिरांमध्ये द्राक्ष अर्पण आणि सेवनाची परंपरा वाढल्यास द्राक्ष विक्रीस चालना मिळेल. याचा फायदा द्राक्ष उत्पादकांना होऊन चांगला दर मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. सध्या देशात सुमारे ३२ लाख टन द्राक्ष उत्पादन घेतले जाते.

प्रत्येक नागरिकाने अल्प प्रमाणात जरी द्राक्ष सेवन केले, तरी देशांतर्गत मागणीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे द्राक्ष शेती विस्तारासह शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार वर्षांत दोन गावांपासून झालेला द्राक्ष दिन उपक्रम महाराष्ट्रातील सात हजारांहून अधिक गावांत पोहोचला आहे.

भगवान शंकराला द्राक्ष अर्पण करणे, मान्यवरांची द्राक्ष तुला करणे तसेच द्राक्ष सेवनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती होत आहे. योग दिन, महिला दिन किंवा कामगार दिनाप्रमाणे द्राक्ष दिनही देशभरात उत्साहात साजरा व्हावा, असे आवाहन द्राक्ष उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा करण्याच्या उपक्रमाला पेटंट मान्यता मिळणे ही महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व द्राक्ष उत्पादकांसाठी अभिमानाची बाब आहे. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक हिताची सांगड घालण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात द्राक्ष दिन देशव्यापी चळवळ होईल, असा विश्वास आहे. -विजय कुंभार, संचालक, यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT