nashik zilla parishad  
नाशिक

Zilla Parishad Employees Old Pension Protest | जुनी पेन्शन, पदोन्नती, वाढीव वेतनश्रेणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एल्गार

राज्य कार्यकारिणी बैठकीत कामबंद आंदोलनासह नागपूरला मोर्चाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने (ओंकारप्रणीत) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्यांवर तत्काळ निर्णय न झाल्यास, आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्याचा तसेच राज्यभर 'कामबंद' आणि 'असहकार आंदोलना'चा निर्णय युनियनच्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.

राज्याध्यक्ष अॅड. बाबूराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीस राज्यातील २५ ते ३० जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस व निर्णायक आंदोलन उभारणे गरजेचे असल्याचे मत मांडले. महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-२ मधील पदोन्नती कोटा ३५ टक्के करावा तसेच लेखा संवर्ग व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. वेतन त्रुटी दूर कराव्यात आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांना दिलेला ग्रामपंचायत प्रशासकपदाचा कार्यभार रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

बैठकीला संघटनेचे मार्गदर्शक बलराज मगर, सुनील जानोरकर, विजयकुमार हळदे, रामचंद्र मडके, सुभाष कराळे, अरविंद अंतुरकर, विजय तांदूळकर, सुरेश म्हात्रे, मेघराज निमसे, लेखा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रेमानंद तलवारे यांच्यासह राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. नाशिक जिल्ह्यातून संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवडे, कार्याध्यक्ष राजेश आहेर, कोषाध्यक्ष रोहिदास जाधव, रवि थेटे, अजय कस्तुरे, श्रीरंग दीक्षित, शालिग्राम उदावंत, संदीप दराडे, विनय जाधव आदींनी सहभाग नोंदविला.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि केंद्राप्रमाणे महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ अदा करावी.

कनिष्ठ व वरिष्ठ सहायक पदोन्नती स्तराबाबत निर्णय घ्यावा तसेच सहायक प्रशासन अधिकारी यांना वर्ग-२ राजपत्रित दर्जा व एस-१५ वेतनश्रेणी लागू करावी.

अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नियुक्ती देऊन पूर्वीप्रमाणे शैक्षणिक पात्रतेनुसार फेरनियुक्ती करावी.

वाहनचालक व शिपाई पदांची कंत्राटी पद्धत रद्द करून नियमित भरती करावी आणि आकृतिबंधात कोणतीही पदे कमी करू नयेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT