Water Tanker : file photo
नाशिक

Nashik Post-Diwali Water Tanker Crisis|201 गावे - वस्त्यांची तहान 60 टँकरवर

दिवाळीनंतर अवघ्या दोन आठवड्यांत टंचाईग्रस्त गावांची संख्या दुप्पट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळाच्या झळा आता तीव्र होत आहेत. पाच तालुक्यांमधील ५३ गावे आणि १४८ वाड्या - वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असून, एकूण २०१ टंचाईग्रस्त गावे -वस्त्यांची तहान भागविण्यासाठी आहे. प्रशासनाला ६० टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या टँकरच्या दररोज १२६ फेऱ्यांमधून पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, यात दोन शासकीय टँकरचाही समावेश आहे.

दिवाळीच्या काळात १०० च्या आसपास असलेली टंचाईग्रस्त गावे वस्त्यांची संख्या अवघ्या दोन आठवड्यांमध्ये दुप्पट झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले. येवला, मालेगाव, चांदवड, देवळा आणि सिन्नर या पाच तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक आहे. तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे.

याशिवाय पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील १४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. देवळा तालुक्यात गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण केले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यात एकाही गावाला टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ प्रशासनावर आली नव्हती. यंदा मात्र नोव्हेंबरमध्येच ६० टँकर रस्त्यावर उतरवावे लागले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटल्यामुळे जिल्ह्याच्या पर्जन्यमानात मोठी तूट निर्माण झाली आहे.

परिणामी, जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. भूजल पातळीत होणारी घट आणि उपलब्ध जलसाठ्यांवरील वाढता ताण यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टँकरच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच संभाव्य उन्हाळ्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनचा नियोजन करावे लागणार आहे

टंचाई एका दृष्टिक्षेपात

टंचाईग्रस्त तालुके :

गावे : ५३

वाड्या-वस्त्या : १४८

एकूण टंचाईग्रस्त घटक : २०१

सुरू असलेले टँकर : ६०

दररोजच्या फेऱ्या : १२६

शासकीय टँकर : २

अधिग्रहित विहिरी : १४

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT