Maha TET Exam File Photo
नाशिक

TET Exam Paper Leak | 'टीईटी'च्या पेपरनंतर आता तारीखही फुटली

TET Exam Paper Leak | 6 जुलैला फेरपरीक्षेच्या बनावट पत्राने गोंधळात भर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ राज्य परीक्षा परिषदेवर आली असतानाच, आता फेरपरीक्षेच्या तारखेबाबतही गोंधळ उडाला आहे. परीक्षा ६ जुलै रोजी होणार असल्याचा दावा करणारे बनावट पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे लाखो उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करीत अद्याप नव्या परीक्षेची तारीख निश्चित झालेली नसल्याचे सांगितले आहे. टीईटीचा पेपर भिवंडी येथे परीक्षेच्या आदल्या दिवशी फुटल्याचे उघड झाल्यानंतर राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांमध्ये होणारी परीक्षा तातडीने स्थगित करण्यात आली. या परीक्षेसाठी सुमारे २ लाख २६ हजार उमेदवार नोंदणीकृत होते.

पेपरफुटीप्रकरणी भिवंडीत काही संशयितांना अटक केली असून प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याचे सह-पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

या रॅकेटची पाळेमुळे शोधून दोषींवर कठोर कारवाईच्या सूचनाही दिल्या आहेत. परीक्षा रद्दनंतर अवघ्या काही तासांत ६ जुलै रोजी फेरपरीक्षा होणार असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्रावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांच्या नावाने स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अधिकृत पत्रातील स्वाक्षरी आणि व्हायरल पत्रावरील स्वाक्षरीमध्ये फरक असल्याचे तसेच दोन्ही पत्रांतील जावक क्रमांकांमध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

नवीन तारीख अद्याप अनिश्चित

परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे उमेदवारांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. टीईटी परीक्षेची नवीन तारीख अद्याप निश्चित केलेली नसून, ती योग्य वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT