TET Paper Leak Case | ज्‍याने पेपर काढले, त्‍यानेच फोडले?

टीईटी पेपरफुटीचे आंंतरराज्यीय रॅकेट; तिघांना कोठडी, दोघे फरार
TET Paper Leak Case |
TET Paper Leak Case | ज्‍याने पेपर काढले, त्‍यानेच फोडले?
Published on
Updated on

भिवंडी : सहा लाख शिक्षकांचे भवितव्य ठरवणार्‍या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीमधील मुख्य दोन आरोपी फरार झाले असून, या प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीत असल्याचे स्थानिक पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. पेपरफुटीसाठी आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पेपरफुटीचा फटका राज्यातील ४ लाख ४ हजार सेवेतील शिक्षकांना बसला आहे. या प्रकरणात ज्या यंत्रणेने पेपर काढले त्यांच्याकडूनच फोडले गेले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. सहायक पोलिस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी न्यायालयात सांगितले की, हे प्रकरण आंतरराज्यीय स्वरूपाचे आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण आहेत, पेपरफुटीचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जाणार आहे.

या प्रकरणातील अटक केलेल्या धीरज बलराज सिंग, राजीव शाव आणि आकाशकुमार सरोजकुमार या तिन्ही आरोपींना भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. भिवंडीत पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शनिवारी टीईटी परीक्षा पुढे ढकलली. त्यांनी छापा टाकून तीन जणांनी आणलेल्या प्रश्नपत्रिका जप्त केल्या. मात्र, दीड कोटींचा आर्थिक व्यवहार करणारे दोघे फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत २८ जूनला होणारी परीक्षा राज्यात १०२८ केंद्रांवर होणार होती. यासाठी राज्य परीक्षा परिषदेने सर्व सुरक्षिततेचे उपाय केले होते. मात्र, दिल्लीत हे पेपर मिळवून ते विकण्यासाठी भिवंडीत आणण्यात आले, असे पेपर येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्याची पडताळणी केली असता तीन जणांकडे पेपरचे संच आढळून आले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अटक केलेले तिघे कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, त्यातील दोघे संशयित पोलिस येण्यापूर्वी फरार झाले, तर तिघांना ताब्यात घेतले.

सोलापुरात अठ्ठावीस हजार टीईटी परीक्षार्थी

सोलापूर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सोलापुरातील ४७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार होती. यासाठी २८ हजार २९८ परीक्षार्थी बसणार होते. पेपर एकसाठी १२ हजार २६१, तर पेपर दोनसाठी १६ हजार ३७ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. परंतु, पेपरच फुटल्याने परीक्षा रद्द झाल्यामुळे या शिक्षकांमध्ये एकूणच यंत्रणेबाबत नाराजी पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news