Shalarth ID Scam Pudhari News Network
नाशिक

Shalarth ID Scam | शालार्थ घोटाळ्याला मोठे वळण! उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

Shalarth ID Scam | बनावट नियुक्ती आदेश, खोट्या कागदपत्रांचा आधार आणि बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षण विभागाला हाताशी धरून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कथित बोगस शिक्षक भरती घोटाळ्याला आता निर्णायक वळण मिळत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बनावट नियुक्ती आदेश, खोट्या कागदपत्रांचा आधार आणि बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षण विभागाला हाताशी धरून सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या कथित बोगस शिक्षक भरती घोटाळ्याला आता निर्णायक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यातील कथित बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाने आतापर्यंत २९८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये नुकत्याच कारवाई झालेल्या ७३ शिक्षकांचाही समावेश आहे. या कारवाईने राज्यभर खळबळ उडाली असून, आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील संशयित शिक्षकांचेही धाबे दणाणले आहेत. बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील कारवायांनंतर आता या घोटाळ्याची व्याप्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

विशेषतः उत्तर महाराष्ट्रात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणावर बोगस नियुक्त्या झाल्याचे तपासातून समोर येत असल्याने संबंधित शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात एसआयटीच्या तपासात तब्बल एक हजाराहून अधिक शिक्षकांनी कथितरीत्या बनावट कागदपत्रे आणि शालार्थ आयडीच्या आधारे नोकऱ्या मिळविल्याची माहिती समोर आली आहे.

या शिक्षकांची सध्या चौकशी सुरू असून, अनेकांविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालकांनी सेवा खंडित करण्यासंदर्भात आदेश काढले आहे. आतापर्यंत खंडित करण्यात आलेल्या २९८ सेवांमध्ये माध्यमिक विभागातील २९१, तर प्राथमिक विभागातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे शिक्षण संस्थांपासून ते शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. या प्रकरणात संस्था चालक, वरिष्ठ शिक्षणाधिकारी, एजंट आणि वेतन अधीक्षक अशा विविध स्तरांवरील संशयितांना अटक झाली आहे. काही आरोपी तुरुंगात असून, काहींना अंतरिम जामीन मिळाला आहे. बीडमधील कारवाईच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील संशयित शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

आधार'मधील नाव, लिंग व जन्मतारीख बदलासाठीही प्रक्रिया निश्चित

शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीचे प्रस्ताव, नियुक्ती दिनांकातील बदल तसेच आधार कार्डवरील नाव, लिंग आणि जन्मतारखेसंबंधी माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रक्रिया निश्चित केली आहे. दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित शिक्षणाधिकारी आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे विभागातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीतील पदनिर्मिती, नियुक्ती दिनांक बदल आणि आधार बेसमधील नाव, लिंग व जन्मदिनांक बदलण्याचे प्रस्ताव यापूर्वीच कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र, या प्रस्तावांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक शिफारशी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाइन पोर्टलवर प्रस्ताव सादर करणे बंधनकारक

शालार्थ प्रणालीमध्ये पदनिर्मिती करण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील 'प्रपत्र अ' भरून प्रस्ताव सादर करायचा आहे. हा प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक / प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर यांच्याकडे पाठविण्याच्या सूचना आहेत. संबंधित अधीक्षकांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शालार्थ ऑनलाइन प्रणालीमध्ये पुढील कार्यवाही करावी.

पदनिर्मिती प्रस्तावात कोणती माहिती आवश्यक.

शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध नसलेल्या पदांच्या निर्मितीसाठी सादर करावयाच्या प्रपत्र अ मध्ये शाळेचे नाव व पत्ता, यू-डायस क्रमांक, शालार्थ आयडी, निर्माण करावयाच्या पदाचे नाव व संख्या, मंजूर पदांची संख्या, पदनिर्मितीबाबतचा शासन निर्णय क्रमांक व दिनांक, पद रिक्त होण्याचे कारण आणि पद मंजुरीचा दिनांक आदी माहिती भरणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT