plane  Pudhari
नाशिक

Iran Israel conflict : सौदीतील नाशिक, मालेगावचे यात्रेकरू सुखरूप

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे शहर-ए-खतीब यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणात नाशिक, मालेगाव व धुळ्यातील शेकडो यात्रेकरू सौदीत अडकले आहेत. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे या यात्रेकरूंचा परतीचा प्रवासही अनिश्चित झाला आहे.

दरम्यान, हे सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत. स्थानिक प्रशासन तसेच उमराह टूर एजन्सीकडून या भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उमराह यात्रेसाठी मक्केत असलेले शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन अशरफी यांनी केले आहे.

मालेगावमधील 700 हून अधिक, तर नाशिकमधील 500 हून अधिक भाविक सौदीत मक्का-मदिना येथे उमराह यात्रेसाठी गेले आहेत. अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी सौदीतील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.

सर्व यात्रेकरू पूर्णपणे सुरक्षित आहेत. ते मक्का - मदिना येथील हॉटेल्समध्ये मुक्कामाला असून त्यांचे नियमित धार्मिक विधी सुरू आहेत. आमचा त्यांच्याशी सतत संपर्क आहे. कुटुंबीयांनी घाबरून जाऊ नये, असे टूर एजन्सीच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रवाशांना प्राधान्याने भारतात परत आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

मक्केत यात्रेसाठी गेलेले नाशिकचे शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी उमराहसाठी गेलेले नाशिक व परिसरातील सर्व यात्रेकरू संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत. ज्यांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांना टूर ऑपरेटरकडून सहकार्य मिळत आहे. राहणे तसेच जेवणाची व्यवस्था आहे. कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लक्ष दिले जात आहे.
हाजी दस्तगीर शेख, यात्रेकरू
नाशिक आणि आसपासच्या भागातील सर्व भाविकांशी आमचा सतत संपर्क सुरू आहे. सर्व जण सुखरूप आणि सुरक्षित आहेत. कुटुंबीयांनी कोणतीही अफवा किंवा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
हाफीज हिसामोद्दीन अशरफी, शहर-ए-खतीब, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT