Land Pudhari
नाशिक

Nahsik NA Land | बिनशेती जमिनींचा वार्षिक कर रद्द! आता एकदाच भरावे लागणार अधिमूल्य

Nahsik NA Land | या निर्णयामुळे बिनशेती वापराखालील जमिनींच्या मालकांना वारंवार वार्षिक कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बिनशेती (एनए) जमिनींसाठी दरवर्षी भरावा लागणारा अकृषिक कर आता रद्द झाला असून, त्याऐवजी शासनाने एकरकमी अकृषिक रूपांतरण अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था लागू केली आहे. या निर्णयामुळे बिनशेती वापराखालील जमिनींच्या मालकांना वारंवार वार्षिक कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही.

मात्र, संबंधित पात्र मिळकतधारकांना शासनाने निश्चित केलेले अधिमूल्य एकदाच भरावे लागणार आहे. या नव्या नियमांची माहिती देण्यासाठी आणि किती रक्कम भरावी लागेल, याबाबत मार्गदर्शनासाठी शहरात सोमवारी (दि. ३०) विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणांनुसार तसेच महसूल व वन विभागाच्या १० फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही नवीन व्यवस्था लागू केली आहे. यापूर्वी बिनशेती वापराखालील जमिनींवर दरवर्षी अकृषिक आकारणी केली जात होती. आता ही वार्षिक आकारणी रद्द करून त्याऐवजी एकरकमी अधिमूल्य भरण्याची तरतूद केली आहे.

या बदलामुळे शहरातील घरमालक, भूखंडधारक आणि बिनशेती वापराखालील जमिनींच्या मालकांमध्ये या नियमांविषयी संभ्रम असण्याची शक्यता आहे. अपर तहसील कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत.

या शिबिरांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अधिमूल्याचे दर, पात्रता, रक्कम निश्चित करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन वा विहित पद्धतीने भरणा करण्याच्या प्रक्रियेची माहिती देतील. त्यामुळे नागरिकांना आपल्या मिळकतीवर किती अधिमूल्य देय आहे, हे समजून घेता येणार आहे.

३१ डिसेंबर अंतिम मुदत

एकरकमी अधिमूल्य रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२६ आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता नागरिकांनी आतापासूनच आपल्या मिळकतीची कागदपत्रे तपासून अधिमूल्याची रक्कम निश्चित करून घ्यावी, असे आवाहन अपर तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT