गुलमंडीत तब्बल २५ वर्षांनंतर धावणार सिटी बस Pudhari
नाशिक

MSRTC Bus Fare Hike | राज्य परिवहन प्राधिकरणाची भाडेवाढीस मंजुरी

MSRTC Bus Fare Hike | एसटी बस प्रवाशांना महागाईचा फटका; राज्य परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढीस मंजुरी, प्रत्येक तिकिटावर 5 रुपयांचा अतिरिक्त भार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासीभाड्यात वाढ करण्यास राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाच्या शुक्रवारी (दि. १७) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वाढते इंधन दर, टायर व सुट्या भागांच्या किमती, बस दुरुस्ती व देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह संचालनावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करून प्राधिकरणाने भाडेवाढीस मंजुरी दिली.

नवीन निर्णयानुसार साधी बस, विनावातानुकूलित जलद आणि वातानुकूलित शिवशाही सेवांच्या प्रवासभाड्यात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपये अपघात साहाय्यता निधी आणि ३ रुपये स्वच्छता अधिभार आकारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक तिकिटावर ५ रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असून, किमान प्रवासभाड्यात वाढ होणार आहे.

निमआराम बससेवेच्या प्रतिकिलोमीटर भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन बससेवा अधिक सक्षम करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत महामंडळाच्या आर्थिक स्थितीचा तसेच प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढविणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

बसची स्वच्छता, देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर पोलिस महासंचालकांचे प्रतिनिधी सुनील भारसाड तसेच सचिव रवि गायकवाड उपस्थित होते. बैठकीत एसटी महामंडळाच्या बस रंगसंगतीबाबत सचिवांनी केलेल्या कार्यवाहीची नोंदही घेण्यात आली.

अतिरिक्त आकारणी (रुपये)

  • अपघात साहाय्यता निधी: २ प्रतिप्रवासी

  • स्वच्छता अधिभार: ३ प्रतिप्रवासी

  • एकूण अतिरिक्त अधिभार: ५ प्रतिप्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT