Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela | नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ; प्रत्येकी 7 कोटी मिळणार

Simhastha Kumbh Mela | आखाड्यांना अतिरिक्त दोन कोटींची खैरात : आता सिंहस्थातील विकासकामांना मिळणार गती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. साधू-महंतांची नाराजी दूर करत शासनाने शैव आणि वैष्णव आखाड्यांच्या निधीत घसघशीत वाढ केली असून, आता प्रत्येक आखाड्याला तब्बल ७ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे.

कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर आता प्रत्यक्ष पायाभूत सुविधांच्या उभारणीला वेग देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. आखाड्यांच्या अंतर्गत कामांसाठी सुरवातीला प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी निश्चित केला होता. मात्र, विकासकामांचा वाढता विस्तार पाहता साधू-महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला.

त्यानंतर हा निधी ५ कोटींपर्यंत वाढवला होता. तरीही कामांची व्याप्ती आणि साधू-महंतांमधील असंतोष लक्षात घेऊन शासनाने पुन्हा अतिरिक्त २ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता सर्व आखाड्यांना प्रत्येकी ७ कोटी रुपये उपलब्ध होणार असून, आखाडा परिषदेने या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पुढील ७ ते ८ महिन्याचा कालावधी विकासकामांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वरचे १० शैव आखाडे आणि नाशिकचे ३ वैष्णव आखाडे यांनी आपल्या परिसरातील कामांची सविस्तर यादी संबंधित नगरपालिका आणि प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे.

ही कामे कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत.
नव्या घाटांची उभारणी, दर्शनपथ, अपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा योजना आणि अतिक्रमण निर्मूलन यांसारखी महत्त्वाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी लागणार आहेत. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अपूर्ण कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जुलै २०२७ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

१३ आखाड्यांतील अन्नछत्र शिवसेनेच्या वतीने

कुंभमेळा काळात भाविक आणि साधू-संतांच्या सेवेसाठी चालवले जाणारे अन्नछत्र हा आखाड्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व खर्चिक भाग असतो. नाशिकमधील ३ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० अशा एकूण १३ आखाड्यांमध्ये चालणाऱ्या अन्नछत्राची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आहे. हे अन्नछत्र शिवसेनेकडून चालवण्यात येणार असल्याने आखाड्यावरील भोजन्याचा खर्चाचा मोठा ताण हलका होणार आहे.

शासनाकडून कामांना सुरुवात करण्यास आधीच विलंब झाल्याने अनेक कामे अध्याप प्राथमिक व अपूर्ण अवस्थेत आहेत. आता उर्वरित कालावधीत यंत्रणेने अधिक वेगाने हालचाली करून कामे मार्गी लावणे आवश्यक आहे. प्रशासनाने कामांना अपेक्षित गती दिल्यास जुलैपर्यंत सर्व कामे आटोपतील आणि सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडेल.
— महंत शंभरानंद सरस्वती (कोषाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT