नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्याने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेरी-३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीत विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळापत्रकानुसार १८ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते २० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ पर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, भाग - १ मधील दुरुस्ती आणि भाग - २ मध्ये पसंतीक्रम अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार असून अर्ज लॉक करणे बंधनकारक राहणार आहे. २१ व २२ जून रोजी अलॉटमेंट प्रक्रिया राबविण्यात येणार असून २३ जूनला सकाळी १० वाजता फेरी - ३ चा प्रवेश निकाल जाहीर केला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार आहे.
तसेच संबंधित महाविद्यालयांनाही प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांच्या याद्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना २३ जून दुपारी १२ वाजल्यापासून ते २५ जून सायंकाळी ६ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
या कालावधीत विद्यार्थ्यांनी 'प्रोसीड अडमिशन' पर्याय निवडून संबंधित महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान, २६ जून रोजी चौथ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून २७ जून रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.