

मुंबई: राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ ते ९ जून या कालावधीत नव्याने नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच पसंतीक्रम भरता येणार असून, दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी १३ जून रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
राज्यातील ९ हजार ५९४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पहिल्या नियमित फेरीत ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडणे आवश्यक आहे. सर्व फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज 'अनलॉक' केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन लॉक करणे अनिवार्य आहे.
दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असे आहे दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक : अर्ज नोंदणी, दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे : ६ ते ९ जून, दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर: १३ जून, महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे : १३ ते १६ जून.