नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली भारत फोरकास्ट सिस्टिमचा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यात मोठी सुधारणा होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसमवेत करार महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे राज्याच्या आपत्तीपूर्व तयारी आणि अतिवृष्टीसारख्या हवामानाशी संबंधित संकटांना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
या करारामुळे भारत सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टिम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे.
राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र आणि भू-स्थानिक निर्णय सहाय्य प्रणालीच्या माध्यमातून ही प्रणाली कार्यान्वित केली जाईल. यामुळे महाराष्ट्र देशातील असे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने डेटा आणि कार्यप्रवाहांचा वापर करत आपत्ती व्यवस्थापन व पूर्वसूचना प्रणाली अधिक सक्षम केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे राज्य व जिल्हास्तरावरील निर्णय प्रक्रिया वेगवान आणि माहिती आधारित होईल. यामुळे पूर्वसूचना प्रणाली अधिक प्रभावी बनून शेवटच्या टप्प्यापर्यंत माहिती पोहोचवणे सुलभहोईल.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले की, यामुळे वैज्ञानिक हवामान माहिती थेट जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या हातात पोहोचणार आहे. राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही एक प्रभावी पायरी ठरेल.
आपत्तींची पूर्वतयारी शक्य
75 या प्रणालीमुळे उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळ, पूर आणि भूस्खलन आपत्तींबाबत अधिक वेगवान आणि प्रभावी पूर्वतयारी शक्य होणार आहे. हवामानासंबंधी माहिती दर तीन तासांनी अद्ययावत केली जाणार आहे. पर्जन्यमान, तापमान, वातावरणीय दाब, वाऱ्याचा वेग व दिशा, ढगांचे प्रमाण याबाबत प्रत्यक्ष वेळेत माहिती उपलब्ध होईल.