नाशिक : निखिल रोकडे
राज्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या केवळ अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल १७ हजार ३४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ एप्रिल ते १६ जून २०२६ या कालावधीत विभागाने राज्यभर धडक कारवाया करीत १६ हजार ६९ जणांना अटक केली असून, ६७९ वाहने जप्त केली आहेत.
या कारवाईत ६२.०७कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः गावठी दारू, परराज्यातून होणारी महद्य तस्करी तसेच स्पिरिट आणि रसायनांच्या अवैध साठ्यांवर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गावठी दारू, देशी दारू, बिअर, स्पिरिट, वॉश, ताडी तसेच मद्यनिर्मितीसाठी वापरले जाणारे रसायन यांचा समावेश आहे.
अवैध मद्यनिर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हानिहाय विशेष पथके कार्यरत असून, सातत्याने छापेमारी सुरू आहे. राज्यातील उत्पादन शुल्क विभाग हा शासनाच्या महसुलाचा एक प्रमुख स्रोत असून, मद्यविक्रीतून दरवर्षी जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला प्राप्त होतो.
तथापि, अवैध मद्यविक्री, बनावट दारूनिर्मिती आणि परराज्यातून महाराष्ट्रात तस्करीने आणल्या जाणाऱ्या प्रतिबंधित दारूविक्रीमुळे शासनाचे आर्थिक नुकसान होते. याशिवाय कठोर कायदेशीर कारवाईवरही विभागाने भर दिला आहे.
कलम ९३ अंतर्गत १,४०१ प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, बेकायदा दारूविक्रीची ३३६ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. विविध प्रकरणांत १.९८ कोटी रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले असून, बंधपत्रांतर्गत ३४ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये एमपीडीएअंतर्गत २ हद्दपारी आदेश जारी
अवैध दारूनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक हा गुन्हा असून, याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी उत्पादन शुल्क विभागाशी १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधवा, वैध मद्यविक्रीविरोधात कारवाया सुरू राहतील.प्रसाद सुर्वे, सहआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क