AI Based EV Battery Pudhari
नाशिक

EV Sales Report 2026 | अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम; इंधनाच्या दरवाढीमुळे ग्राहकांचा मोर्चा ईव्हीकडे, विक्रीत 19 टक्क्यांची वाढ

EV Sales Report 2026 | महाराष्ट्रात अवघ्या दोनच महिन्यांमध्ये ४५ हजार १६८ ईव्ही रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

अमेरिका-इराण यांच्यात युद्ध सुरूच असल्याने भारतासह जगभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतींवर अनिश्चिततेचे सावट आहे. परिणामी, ग्राहक पेट्रोल डिझेल वाहनाना नकार देत असून, त्यांचा कल ईव्हीकडे वळत आहे. गेल्या जानेवारी, फेब्रुवारी या अवघ्या दोनच महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तब्बल ४५ हजार १६८ ईव्हींची विक्रमी विक्री झाली आहे.

ईव्ही विक्रीतील ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के इतकी आहे. पेट्रोल डिझेल वाहनांना ईव्ही सर्वोत्तम पर्याय ठरत असला, तरी अद्यापही देशात पेट्रोल डिझेल वाहनांचीच चलती आहे. तर ईव्ही खरेदीचा ट्रेंड काही टक्क्यांत आहे.

मात्र, अमेरिका - इराण युद्धामुळे आता हे चित्र बदलण्याची शक्यता असून, त्यातच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल -डिझेल वाहनांना काहीही भवितव्य नसल्याचे विधान केल्यामुळे देशात ईव्ही विक्रीत अचानक वाढ झाली आहे.

ईव्ही विक्रीत महाराष्ट्राचे देशात सुमारे १२ टक्के इतके योगदान आहे. मात्र, यावर्षी त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. गेल्या २०२५ मध्ये महाराष्ट्रात २ लाख ६६ हजार इतक्या ईव्हींची विक्री झाली होती. यंदा जानेवारी, फेब्रुवारी या दोनच महिन्यांमध्ये ४५ हजार १६८ ईव्हींची विक्री झाल्यामुळे यंदा राज्यात ईव्ही विक्रीचा टप्पा ३ लाखांच्या पार जाण्याचा अंदाज आहे.

दुचाकी विक्री सुसाट

२०२५ मध्ये ईव्ही वाहनात दुचाकींची सर्वाधिक विक्री झाली. सुमारे २ लाख १६ हजार १४८ युनिट्सची महाराष्ट्रात विक्री झाली. त्यानंतर १५ हजार ७९२ तीनचाकींची विक्री झाली. चारचाकी विक्रीचा आकडाही मोठा असून, सुमारे ३० हजार ५९६ युनिट्सची विक्री झाली, तर कमर्शिअल वाहनांमध्ये ३ हजार ९७१ युनिट्सची विक्री झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये ईव्ही जोरात

महाराष्ट्राचा सुवर्णत्रिकोण असलेल्या मुंबई, पुणे, नाशिकमध्ये ईव्ही खरेदीकडे सर्वाधिक कल असल्याचे दिसून येत आहे. २०२४ या वर्षात मुंबईमध्ये तब्बल १८ हजार ८४४ ईव्हींची विक्री झाली होती. २०२६ मध्ये अवघ्या दोनच महिन्यांत हा आकडा २३ हजार १८६ वर पोहोचला आहे. पुण्यात २०२४ मध्ये ३५ हजार ९९५, तर २०२५ मध्ये ३७ हजार ४७० ईव्ही विक्री झाली. नाशिकमध्ये २०२४ मध्ये ११ हजार ७५० ईव्ही विक्री झाली, तर २०२५ मध्ये १४ हजार ९३८ युनिट्सची विक्री झाली. २०२६ मध्ये यात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे.

जागतिक घडामोडींमुळे पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडवणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे ईव्ही खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत असून, २०२६ हे वर्ष ईव्हीसाठी विक्रमी ठरण्याचा अंदाज आहे.
- समकीत शहा, सहव्यवस्थापक, जितेंद्र ईव्ही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT