Maharashtra Epstein Files Movie Teaser  
नाशिक

Maharashtra Epstein Files Movie Teaser | भोंदू खरात प्रकरणावरील चित्रपटाचे प्रदर्शन 2 ऑक्टोबरला

Maharashtra Epstein Files Movie Teaser | महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स'चा टीझर रिलीज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स' या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यामधील अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा पहिला लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, अशोक खरातची भूमिका कोण साकारणार, याबाबत अद्याप निर्मात्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

'आता सगळं उघड होणार..!' या टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यभर प्रदर्शित होणार असून, अशोक खरात प्रकरणातील कोणते पैलू पडद्यावर मांडले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधील अशोक खरात याच्यावर अनेक महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

या प्रकरणात अनेक राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींची नावे चर्चेत आली होती. त्यानंतर रूपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांच्यासोबतचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्या छायाचित्रात त्या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत होत्या.

याच प्रसंगाचे चित्रण या चित्रपटाच्या टीझरमध्ये करण्यात आले असून, दीपाली सय्यद यांचा लूक त्या व्हायरल छायाचित्राशी साधर्म्य दर्शवित असल्याने त्याची विशेष चर्चा रंगली आहे. चित्रपटात अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक घटनांवर प्रकाश टाकला जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटात कोणते खुलासे होणार, हे २ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी, या भूमिकेमुळे आपल्याला फोनवरून धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. रूपाली चाकणकरांची भूमिका करू नका, अशा आशयाचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे या चित्रपटाभोवतीचे वाद अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चित्रपटाची कथा अद्याप गोपनीय ठेवलेली असून, प्रमुख कलाकारांची संपूर्ण यादीही जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहिली असून, पटकथा व संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायाचित्रण आकाश काकडे, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर, वेशभूषा आकांक्षा गांधी, तर प्रॉडक्शन हेड म्हणून सचिन घनवंत आणि प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून नेहा घोडके काम पाहात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT