Crime News In Marathi
नाशिक : सतीश डोंगरे
कधीकाळी ड्रग्ज आणि मुंबई हे समीकरणच होते. जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता, तेव्हा नशेचा धूर चौकाचौकात निघायचा. पुढे ड्रग्जची ही नशा ठाण्यापर्यंत पोहोचली. कालांतराने पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्डच्या मुसक्या आवळल्यावर ड्रग्जचा उघड सुरू असलेला बाजार चोरीछुपे सुरू झाला.
नशेच्या या धंद्यातील अर्थकारण बघता, मुंबई, ठाण्यातील ड्रग्जच्या कारभाऱ्यांनी नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर या सीमावर्ती भागांसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सिंडिकेट तयार करून नशेचा काळाधंदा जोरात सुरू केला. धार्मिक अधिष्ठान प्राप्त नाशिक असो वा विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेले पुणे असो या जिल्ह्यांमध्ये पेडलरचे जाळे थैमान घालत आहे. यात महिलांचा सहभाग चिंताजनक आहे.
मागील सहा महिन्यांत मुंबई- ठाणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्रीच्या घटना समोर येत आहेत, त्यावरून मुंबई, ठाण्यातील ड्रग्ज माफियांनी राज्यातील इतर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: धार्मिक, ऐतिहासिक तसेच शैक्षणिक वारसा लाभलेल्या जिल्ह्यांमध्ये सिंडिकेट तयार करून ड्रग्ज विक्रीचे जाळे विस्तारण्याची मोडस ऑपरेंडी माफियांची असल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकमध्ये ड्रग्जनिर्मितीचे कारखाने उद्ध्वस्त केल्यानंतरही ड्रग्ज पेडलरचे पाळेमुळे खोदून काढण्यात पोलिसांना म्हणावे तितके यश आलेले नाही. परिणामी, २०२३ ते २५ जून २०२५ या तीन वर्षांत तब्बल ७१० किलोंहून अधिक तब्बल १२ कोटींचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. १०० गुन्हे दाखल करून २०६ पेडलरला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अशातही एमडी ड्रग्ज विक्रीचे प्रकार सुरूच आहेत. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव या जिल्ह्यांतही ड्रग्ज विक्री सुसाट आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पेडलर सक्रिय असून, विदर्भात नागपूरमध्ये ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांत ७१० किलो ड्रग्जचा साठा - २६ जून
धुळ्यात पाच टन अमली पदार्थांचा आढळला साठा - ३ जून
जळगावात आढळला १७ किलो एमडीचा साठा - २० मे
कोल्हापुरात अमली पदार्थ विक्रीच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश - २० फेब्रुवारी
सांगलीत ३० कोटींचे एमडी जप्त - २ फेब्रुवारी
छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळले एमडी ड्रग्जचे गोडाउन - २६ जून
नागपूरमध्ये घरातूनच एमडी विक्री केली जात असल्याचे उघड - ७ जून
अहिल्यानगरमधील श्रीरामपूर एमआयडीसीत १४ कोटींचे एमडी जप्त - १६ मे
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात मागील वर्षी ड्रग्ज विक्रीचा पुणे पॅटर्न समोर आला होता. पुण्यातील एका एमआयडीसीमध्ये ड्रग्जनिर्मिती केली जात होती. त्यानंतर हे ड्रग्ज देशातील विविध भागांसह विदेशातही पाठविले जात होते. पोलिसांनी याप्रकरणी तीन ड्रग्ज पेडलरला बेड्या ठोकल्या होत्या. या पेडलरकडून कुरिअरने ड्रग्ज पाठविले जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. सध्या कुरिअरचा हाच पॅटर्न इतर जिल्ह्यांमध्येही राबविला जात असून, पोलिस पेडलरच्या मागावर आहेत.
महाराष्ट्राला मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंंगणा, कर्नाटक, गोवा या सहा राज्यांच्या सीमा लागून असून, या राज्यांमधून महाराष्ट्रात, तर महाराष्ट्रातून या राज्यांमध्ये ड्रग्जच्या देवणाघेवाणीसाठीची आंतरराज्य टोळी सध्या सक्रिय आहे. विशेषत: नाशिक, धुळे या जिल्ह्यांना लागून असलेेल्या गुजरातमध्ये एमडी ड्रग्जची नेहमीच देवाणघेवाण होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. याशिवाय जळगावमार्गे, नागपूरमध्ये मध्य प्रदेशमध्ये, तर कोल्हापूर, सांगली मार्गे गोवा आणि कर्नाटक या राज्यांत ड्रग्ज विक्री करणारी आंतरराज्य टोळी सक्रिय आहे.
मुंबईतील छोटा सोनापूर येथून मुस्लीम समाजासाठी ड्रग्ज मुक्तीची मोहीम सुरू केली. आज संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबविली जात आहे. २०११ पासून आतापर्यंत हजारो तरुण- तरुणींना ड्रग्जमुक्त करण्यात यश आले. जर ड्रग्ज घेण्यासाठी लोक नसतील, तर विकण्यासाठीही लोक नसतील.हजरत सय्यद मोईन मिया साहब, प्रमुख, अमली पदार्थविरोधी मोहीम
जानेवारी ते जून या सहा महिन्यात पोलिसांनी विविध जिल्ह्यांमध्ये केेलेल्या कारवायांत तब्बल १२६ ड्रग्ज पेडलर महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यात नाशिकमध्ये सर्वाधिक महिला पेडलर आढळल्या आहेत. नागपूरमध्ये तर एक महिला ड्रग्जचे रॅकेट घरातूनच चालवित होती, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज पेडलर म्हणून अटक केलेल्या पतीनंतर पत्नीनेच सूत्रे हाती घेत ड्रग्जचा कारभार सुरू केेला होता. महिलांकडून तरुण- तरुणींना सर्वाधिक लक्ष्य केले जात असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
सोशल मीडियामुळे ड्रग्ज माफियांना ग्राहक शोधणे सोयीचे होत असल्याने, राज्यातील विविध भागांमध्ये ड्रग्ज पेडलर पोहोचत आहेत. पूर्वी ड्रग्ज कुठे मिळतेय याची माहिती नसायची, आता मात्र ती सहज उपलब्ध होते. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीची गरज आहे.सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एनडीपीएस