नाशिक: नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व जलदगती गोलंदाज रामकृष्ण घोषची यंदा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटची ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा आहे. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारीदरम्यान जयपूरला महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत.
सत्यजित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मार्च २०१७ पासून सत्यजित महाराष्ट्र संघातर्फे खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या ४८ सामन्यांत सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे ८१ बळी घेतले आहेत. रणजी स्पर्धेबरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजितने २०१२ पासूनच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. भेदक गोलंदाजीबरोबर आक्रमक फलंदाजी केलेली आहे.
रामकृष्ण देखील गेल्या दोन हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धेबरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात २०२२ पासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जलदगती गोलंदाज व फलंदाज अशी ओळख असलेला रामकृष्ण घोष मागील हंगामापासून विविध स्पर्धांत आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवत आहे. मागील वर्षापासून आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्सतर्फे निवड झाली आहे.