नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र चेंबरची द्वैवार्षिक निवडणूक ही विकासाच्या मुद्यांपेक्षा आपसातील मतभेदांमुळेच जास्त गाजत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत चेंबरमध्ये घडलेल्या दोन गटांतील हायव्होल्टेज ड्रामाची खरपूस चर्चा मतदानाच्या दिवशी रंगली होती. याबाबतचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला होता की, रात्री 2.30 पर्यंत दोन्ही गट मुंबई नाका पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारीसाठी ठाण मांडून होते, तर जिल्हा न्यायालयानेदेखील मतदानाच्या आदल्याच दिवशी चेंबरला समन्स बजावल्याने, दोन्ही पॅनलमधील एक गट न्यायालयात, तर दुसरा गट निवडणूक प्रक्रियेत दिसून आला. दरम्यान, पहिल्या दिवशी १५६४ पैकी ३६७ इतके मतदान झाले.
शतकमहोत्सव साजरा करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर निवडणुकीत छाननी प्रक्रियेपासून सुरू झालेला वाद मतदानाच्या आदल्या दिवशी विकोपाला गेल्याचे दिसून आले. प्रगती पॅनलकडून निवडणूक स्थगितीसाठी उच्च न्यायालयाबरोबरच जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे मतदानाच्या दिवशीदेखील न्यायालय प्रक्रियेचा ससेमिरा कायम होता. गव्हर्निंग काउन्सिलसाठी प्रगती पॅनलकडून उमेदवारी अर्ज केलेल्या मुकेश देशमुख यांनी, छाननी समितीने चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप करीत गेल्या ८ जून रोजी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यानुसार जिल्हा न्यायालयाने महाराष्ट्र चेंबरसह निवडणूक निर्णय अधिकारी, छाननी समिती चेअरमन आणि तक्रार निवारण समिती चेअरमनला बुधवारी (दि. १०) समन्स बजाविले होते. मात्र, हे समन्स संबंधितांना 'बेलीफ' कडून न बजावता, प्रगती पॅनलच्या काही मंडळींनी सायंकाळी ७ च्या सुमारास महाराष्ट्र चेंबरमधील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे वाद उफाळून आला होता.
प्रगती पॅनलचे नेतृत्व कांतिलाल चोपडा यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांच्यावर हात उगारल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा वाद इथेच थांबला नाही, तर मुंबई नाका परिसरातील हॉटेलबाहेर मध्यरात्री १२ च्या सुमारास कांतिलाल चोपडा आणि छाननी समितीचे चेअरमन संतोष मंडलेचा यांच्यात 'बाप' काढल्यावरून बाचाबाची झाली होती.
त्यानंतर दोन्ही गट रात्री २.३० पर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात परस्पर तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटांकडून तक्रार अर्ज घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बजावलेल्या समन्सवर गुरुवारी (दि. ११) जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली असता, १६ जून ही पुढील तारीख देण्यात आली. मात्र, मुकेश देशमुख यांच्या वकिलांकडून या तारखेपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने, शुक्रवारीच (दि. १२) पुन्हा सुनावणी घेतली जावी, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कधीही अनुभवयास येऊ नये, अशी निवडणूक सध्या महाराष्ट्र चेंबरचे सभासद मतदार अनुभवत आहेत. कोणाचा काही संबंध असो वा नसो, सत्ताधारी गट त्या व्यक्तीला गोवण्याचा प्रयत्न करीत आहे. बुधवारी (दि.१०) घडलेल्या प्रकारात कांतिलाल चोपडा वा माझा काहीही संबंध नाही. तरीदेखील पोलिसांत दिलेल्या तक्रार अर्जात माझे नाव नमूद केले आहे. पराभव दिसून येत असल्यानेच, हा सर्व आटापिटा सुरू आहे.- सचिन जाधव, प्रगती पॅनल
दहा महिन्यांसाठी महाराष्ट्र चेंबरला मी माझे कार्यालय दिले होते. मात्र, कालावधी उलटूनदेखील त्यांनी कार्यालय रिकामे केले नसल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी मी माझ्या कार्यालयात गेलो होतो. तसेच तेथील मतदान केंद्राची मला माहिती घ्यायची होती. मात्र, त्यांनी माहिती न देता माझ्याशी अरेरावी केली. संतोष मंडलेचा यांच्यासमवेत केवळ शाब्दिक बोलणी झाली, त्यांच्याशी वाद झाला नाही. पराभव समोर दिसत असल्याने, ते खोटेनाटे आरोप करीत आहेत. व्हायरल केला जात असलेला व्हिडिओ एडिट केलेला आहे.- कांतिलाल चोपडा, नेतृत्व, प्रगती पॅनल