नाशिक : सतीश डोंगरे
मागील काही दिवसांपासून राज्यातील तब्बल १४ शहरांतील हवा प्रदूषणाने सातत्याने धोकादायक पातळी ओलांडली आहे. पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव या शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सलग अनेक दिवस ‘खराब’ श्रेणीत राहिल्यामुळे या शहरांची गणना महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत केली जात आहे. याशिवाय निसर्ग संपन्नता लाभलेल्या नाशिक, कोल्हापूरसारख्या शहरांची हवा देखील दूषित म्हणून नोंदवली जात असल्याने चिंता वाढली आहे.
हिवाळ्यात थंड हवामान प्रदूषित घटकांना पृष्ठभागावरच दाबून ठेवत असल्याने या काळात हवा दूषित होण्याचे प्रमाण वाढत असते. मात्र, वाहनांचा धूर, कारखाने, कचरा जाळणे, शेतातील धूर, बांधकाम यासारख्या घटकांवर नियंत्रणच नसल्याने राज्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने घसरत आहे. चालू डिसेंबर महिना तर सर्वाधिक प्रदूषित ठरला आहे. डिसेंबरमध्ये राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १७३ वर गेल्याची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड या शहरातील एक्यूआय दोनशेपर्यंत गेल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, मुंबई, अमरावती, अकोला, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या शहरांतील हवा देखील खराब श्रेणीत सातत्याने नोंदवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तत्काळ याबाबत पुरेशा उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रदूषित शहरांच्या यादीत नोंदवलेल्या १४ शहरे झपाट्याने विकसित होणारी शहरे आहेत. सद्यस्थितीत या शहरांत पायाभूत सुविधा, रहिवासी आणि व्यावसायिक संकुल, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. वास्तविक, बांधकाम प्रकल्पांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमावली निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे. अशात प्रशासनाकडून ॲक्शन मोडवर येण्याची गरज आहे.
श्वसन, त्वचेच्या आजारात भर
प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेच्या आजारात भर पडत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने घराबाहेर पडणे कटाक्षाने टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. लहान मुले, वयोवृद्धांसाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी.
थंड हवामान प्रदूषित घटकांना पृष्ठभागावरच दाबून ठेवत असल्याने आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे हवेची गुणवत्ता घालवली जावू शकते. नाशिकच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक चांगला आहे. सिंहस्थासाठी सध्या महापालिका, बांधकाम विभाग, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून कामे केली जात आहेत. तरी देखील नाशिकची हवा चांगली आहे. पुढील काळातही या विभागाने नाशिकचा ‘एक्यूआय’ उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी