नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील वाहनधारकांसाठी शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनांवर आकारण्यात आलेल्या आणि अद्याप वसूल न झालेल्या ई-चलनांच्या दंडाच्या रकमेत २० टक्के सवलत देण्यासाठी 'महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना-२०२६' लागू करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबर २०२६ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. गृह विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या वाहतूक दंडाचा भरणा करण्यासाठी वाहनचालकांना आता विशेष सवलतीची संधी उपलब्ध होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या ४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ही योजना तीन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणान्यांवर मोठ्या प्रमाणात ई-चलन जारी होत असले, तरी त्यांची प्रत्यक्ष वसुली होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एस. राजशेखर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या याचिकेवरील २८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अंतरिम आदेशात स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रलंबित दंडाची वसुली करण्यासाठी अभय योजना आणली आहे.
ऑनलाइन किंवा वाहतूक विभागात भरणा पात्र चलनांची रक्कम वाहतूक पोलिसांच्या अधिकृत चलन पोर्टलवर ऑनलाइन किंवा जवळच्या वाहतूक पोलिस विभागात रोखीने भरता येणार आहे. भरणा झाल्यानंतर संबंधित चलनासमोर तडजोडीची नोंद करून वाहनधारकाला पावती दिली जाणार आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये संबंधित आरोपीच्या स्वेच्छेच्या संमतीने आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच तडजोडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर भरण्याचा पुरावा आणि तडजोडीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. योजना सुरू होण्यापूर्वी शासनाच्या खात्यात जमा केलेल्या दंडाच्या रकमेचा परतावा मिळणार नाही. रद्द झालेली किंवा निकाली निघालेली चलनेही सवलतीसाठी पात्र राहणार नाहीत.
अभय योजनेचा कालावधी संपल्यानंतर वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहन परवाना निलंबित करणे, वाहनांचे व्यवहार प्रतिबंधित करणे तसेच वाहन जप्त करण्यासारखी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या योजनेची व्यापक जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
पहिला टप्पा
२१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या आणि १ डिसेंबर रोजी वसुलीसाठी प्रलंबित असलेल्या पात्र ई-चलनांच्या एकूण थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनचालक किंवा मालकांना योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम शासनाच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.
दुसरा टप्पा
१ डिसेंबर २०२६ पासून पुढे जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवर लवकर भरणा सवलत अर्थात अर्जी बर्ड स्कीम लागू राहणार आहे. या टप्प्यातही दंडाच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत मिळेल. मात्र, संबंधित चलन कायदेशीररीत्या बजावल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत दंडाचा भरणा करणे आवश्यक आहे. ही सवलत १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.
तिसरा टप्पा
न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनांचा समावेश करण्यात आला आहे. ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जारी झालेली आणि योजना सुरू होण्याच्या दिवशी सक्षम न्यायालयात किंवा आभासी न्यावालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांच्या थकीत तडजोड शुल्कावर २० टक्के सवलत दिली जाणार आहे. सवलतीनंतरची रक्कम योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत भरावी लागणार आहे.