देवळाली कॅम्प : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर आणि अमरावती-मुंबई या मार्गावर धावणार असून, गाड्यांना नाशिकरोड येथे थांबा आहे.
सर्व नागपूरहून मुंबईकडे ४ आणि ५ डिसेंबर रोजी चार विशेष गाड्या सुटतील. यामध्ये ४ डिसेंबरला सायंकाळी ६.१० वाजता आणि रात्री ११.५५ वाजता, तर ५ डिसेंबरला सकाळी ७.४० वाजता आणि सायंकाळी ६.१० वाजता या गाड्या सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी मुंबईहून नागपूरकडे ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी पाच विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
तसेच अमरावतीहून ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबईकडे आणि मुंबईहून ७ डिसेंबर रोजी रात्री १२.४० वाजता अमरावतीकडे एक विशेष गाडी धावणार आहे. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून, त्यांना १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रकासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एनटीईएस अॅपला भेट द्यावी. वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.