त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये विश्वस्त मंडळाने २,५०० रुपयांची व्हीव्हीआयपी तातडीची दर्शन व्यवस्था सुरू केली आहे. मात्र, नियोजनाअभावी शनिवारी (दि. ३०) आणि रविवारी (दि. ३१) गोंधळाची परिस्थिती पाहावयास मिळाली.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजासमोर थेट दर्शनाचा हट्ट धरलेले भाविक आणि त्यात २,५०० रुपयांचे तिकीट काढण्याची तयारी असलेले व्हीव्हीआयपी असा एकच गोंधळ सकाळपासून सुरू होता. विश्वस्त मंडळाने २,५०० रुपये देणाऱ्यांसाठी खास पेंडॉल टाकला होता. दुपारच्या सुमारास २,५०० रुपयांची रांग लागली. त्यानंतर उत्तर दरवाजाने २०० रुपये दर्शनवरी थांबवून २,५०० रुपये देणाऱ्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होते,
शनिवारी एकाच दिवसात १४ लाख रुपये त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टला देणगी पावतीच्या माध्यमातून मिळाल्याची चर्चा होती. दिवसभरात ५०० भाविकांना २,५०० रुपये घेऊन दर्शन देण्याचे नियोजन आहे. तथापि याचा लाभ घेण्यासाठी किमान एक हजार भाविक इच्छुक असल्याचे शनिवारी व रविवारी दिसले.
दरम्यान २,५०० रुपये दर्शनबारीने पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. २,५०० रुपये खर्च करीत दर्शनासाठी आलेल्या भाविकाला थेट गर्भगृहापर्यंत घेऊन जातात. त्यांना समाधानकारक दर्शन घडवले जाते. यासाठी लागणारा वेळ पाहता, तेवढया वेळेत पूर्व दरवाजा अथवा २०० रुपये दर्शनबारीतील किमान १० ते २० भाविक धक्का देऊन बाहेर काढले जातात. २,५०० रुपये दर्शनाचा भाविक किमान १० भाविकांचा वेळ घेत असेल, तर ५०० व्हीव्हीआयपी नेहमीच्या दर्शनबारीतील ५,००० भाविकांना रोखतात. सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्व दरवाजा दर्शनबारी सुरू असते.
भाविक सुविधेपासून वंचित
रात्री ९ च्या अगोदर दर्शनबारीतील प्रवेश बंद करतात. त्यानंतर दर्शनमंडपात असलेल्या शेवटच्या भाविकाचे दर्शन होते, तोपर्यंत गर्भगृह दरवाजा खुला असतो. शनिवार आणि रविवारी रात्री १२ नंतर शेवटच्या भाविकाचे दर्शन झाले. रात्री १० नंतर मंदिराच्या बाहेर पडलेल्या भाविकाला जेवणाची सुविधा मिळत नाही. सर्वत्र खोदकाम झालेले त्यात अंधारामुळे त्यांना रस्ताही दिसत नाही.
आतापर्यंत कोणाचे होत होते कल्याण ?
दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी २,५०० रुपयांची दर्शनबारी सुरू केली. त्याबरोबर दस्तुरखुद्द विश्वस्तांनी दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचे मान्य केले आहे. एका दिवसात १४ लाख रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे.