नाशिक : धनराज माळी
बचतगटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 'लोकल टू ग्लोबल' धोरण अवलंबिले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असून, याची अंमलबजावणी ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. महिलांचा आर्थिक स्तर उंचवावा, त्यांना रोजगाराअभावी बेरोजगारीला सामोरे जावे लागू नये, त्यांना बचतीची सवय लागून त्यातून स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यातूनच महिला आर्थिक विकास महामंडळ, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून बचतगटाची सुरुवात काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. याची खरी सुरुवात पंजाबमधून झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याची दखल घेत महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कधी काळी बचतगट तयार करून त्यात कमीत कमी दरमहा १० रुपयांची बचत करणेही शक्य नसलेल्या महिला आता स्वयंस्फूर्तीन पुढे येऊ लागल्या आहेत. आज महिला स्वयंसहायता बचतगट ही संकल्पना आता चळवळ झाली आहे. महिला बचतगट म्हणून सुरू झालेली संकल्पना आता शेतकरी बचतगटातही रूपांतर झाली आहे. त्यामुळे बचतगट ही मोठी चळवळ झाली आहे.
बचतगटांमुळे सावकारी पाशातून मुक्तता
पुढे जाऊन बचतगट चळवळ म्हणजे आर्थिक उलाढालीचे केंद्र झाले आहे. बचतगट स्थापन करून बँकेमार्फत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देत भांडवलनिर्मिती करण्यात येत आहे. त्यातून गरजू महिला किंवा शेतकऱ्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे शेतीच्या भांडवलासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एरवी सावकाराकडून उचलावे लागणारे व्याजाचे पैसे घेण्याची वेळ आता येत नाही. यात हप्त्याहप्त्याने पैसे परतफेड करण्याची मुभाही असते. म्हणून महिला किंवा शेतकरी यांना सावकाराकडे चपला झिजवाव्या लागत नसल्याचे समाधान महिलांमध्ये दिसत आहे.
'लोकल टू ग्लोबल' धोरण
रोजगार व उपजीविकेसाठी छोटे-छोटे लघुउद्योग करणाऱ्या, विविध वस्तू व पदार्थ तयार करणाऱ्या स्वयंसहायता गटातील महिलांसाठी महालक्ष्मी सरस या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा व विभाग स्तरावरील प्रदर्शन तसेच आठवडी बाजारात स्टॉल उभारून महिलांना प्रोत्साहन व आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.
ऑनलाइन मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म
यासाठी उमेदमार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली असून, त्याचप्रमाणे Amazon, Flipkart आदी ऑनलाइन मार्केटमध्येही बचतगटांची नोंदणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून तळागाळातील, वंचित व उपेक्षित घटकांतील स्वयंसहायता गटांचे उत्पादन 'लोकल टू ग्लोबल' स्वरूपात पोहोचणार आहे. स्थानिक बाजारावरोबरच ऑनलाइन मार्केटच्या माध्यमातून महिलांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आपले उत्पादन विकण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात यांचा समावेश
पहिल्या टप्प्यात उमेद मॉल उभारणीसाठी १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे विभागातील सातारा, पुणे, सोलापूर; कोकण विभागातील रत्नागिरी-खेड, ठाणे-अंबरनाथः नाशिक विभागातील जळगाव-भुसावळ; तर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव-तुळजापूर, अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला तसेच नागपूर विभागातील वर्धा व नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
महिला झाल्या उद्योजिका
बचतगट हे केवळ बचतीच्या सवयीपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, तर बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटनांची मोठी चळवळ निर्माण झाली आहे. त्यातून शासन-प्रशासन आणि बँका यांच्या सहकार्यातून महिलांना विविध प्रकारचे कौशल्याधारित शिक्षण-प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. आज महिला स्वतः दुसऱ्यांना रोजगार देत आहेत. गृहोद्योग, लहान-मोठी यंत्रसामग्री खरेदी करून त्या माध्यमातून घरातील खाद्यपदार्थ असो की, सॅनिटरी पॅड, पत्रावळी, गारमेंट्स, कटलरी, समूह शेतीतून कृषी उत्पादन, बेकरी प्रॉडक्ट, आर्टिफिशियल साहित्य आदींसह विविध वस्तू तयार करून त्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे कधी काळी रोजगारासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांना सुगीचे दिवस आले आहेत.