कारागृह किंवा सर्वसामान्यांच्या भाषेत 'जेल' हे शब्द उच्चारले, तरी मनात भीती, अनिश्चितता आणि गूढतेची छाया दाटून येते. प्रत्यक्ष अनुभव नसतानाही चित्रपट, कादंबऱ्या आणि ऐकीव कथांमधून आपण तुरुंगाचे ठराविक चित्र मनात रंगवलेले असते. पण त्या उंच भिंतीआडचे खरे जग कसे असते? बंदिजनांचा दिनक्रम, त्यांचे हक्क, आहार, कामकाज, मजुरी, शिस्त आणि पुनर्वसनाची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते? या सर्व बाबींचा सविस्तर वेध घेणारी ही विशेष मालिका आजपासून सुरू करत आहोत.
A day in jail Explained in Marathi
नाशिक : निखिल रोकडे
कुणालाही स्वेच्छेने कारागृहात जावेसे वाटत नाही. कधी कळत-नकळत घडलेल्या गुन्ह्यामुळे, तर कधी अपघाती घटनांमुळे व्यक्तीला तुरुंगवास भोगावा लागतो आणि सुरू होतो वेगळ्याच जगाचा प्रवास. मात्र, कारागृहाचे मूलभूत तत्त्व केवळ शिक्षा देणे नसून, 'सुधारणा आणि पुनर्वसन' हे आहे. तिथे गुन्हेगाराला समाजापासून तात्पुरते दूर ठेवत त्याच्यातील व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला जातो.
शिक्षाधीन कैद्यांचा कामाचा दिवस शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा दिनक्रम अधिक कार्यप्रधान असतो. सकाळी प्रातर्विधी व नाश्त्यानंतर ७.३० ला कारखान्यात किंवा नियुक्त कामावर हजेरी लावावी लागते. ११ वाजता जेवणानंतर पुन्हा कामावर रुजू व्हावे लागते. सायंकाळी ४ नंतर सुटी आणि ५.३० ला जेवण. महिलांसाठी न्यायालयीन कोठडीप्रमाणेच स्वतंत्र दिनक्रम निश्चित आहे.
न्यायालयीन कोठडीतील बंदींचा दिनक्रम
सकाळी ६ वाजता राष्ट्रगीतानंतर दिवसाची सुरुवात होते. प्रातर्विधी, चहा-नाश्ता यानंतर सकाळी ११ वाजता जेवण दिले जाते. दुपारी १२ वाजता मोजणी करत बंदिजनांना पुन्हा लॉकअपमध्ये पाठवले जाते. दुपारी ३ नंतर पुन्हा बाहेर काढले जाते. सायंकाळी चहा, ५.३० ला जेवण आणि अंधार पडण्यापूर्वी अंतिम मोजणी करत बॅरेकमध्ये रवानगी केली जाते, असा शिस्तबद्ध क्रम असतो.
सूर्योदय ते सूर्यास्त : शिस्तबद्ध दिनमान
कारागृहातील दिनक्रम सूर्योदय आणि सूर्यास्ताभोवती फिरतो. प्रकाशात प्रत्येक व्यक्ती स्पष्ट दिसावी, गैरप्रकार टाळावेत यासाठी सकाळी उजाडल्यानंतर कैद्यांना बॅरेकबाहेर काढले जाते आणि अंधार पडण्यापूर्वी पुन्हा आत पाठवले जाते. हिवाळ्यात धुके असल्यास पूर्णपणे निवळल्यानंतरच हालचाल सुरू होते. कोणी अंधाराचा गैरफायदा घेऊ नये, ही प्रशासनाची प्राधान्याने खबरदारी असते.
बंदी कैद्यांचा प्रवेश आणि प्राथमिक प्रक्रिया
न्यायालयाकडून शिक्षा जाहीर झाल्यानंतर किंवा न्यायालयीन कोठडीदरम्यान संबंधित व्यक्तीला कारागृहात दाखल केले जाते. प्रवेशद्वारावर गेट जेलर न्यायालयीन वॉरंटची बारकाईने तपासणी करतो. नाव, सही, शिक्का, गुन्ह्याचा तपशील यांची खातरजमा झाल्यानंतरच प्रवेश दिला जातो. बंदिजनांनी सोबत आणलेले साहित्य नोंदवून कारागृहाच्या स्टोअरमध्ये जमा केले जाते.
नवीन आलेल्या कैद्यांना सुरुवातीला स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कायमस्वरूपी बॅरेक निश्चित केली जाते. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील (कलम ३०२) आरोपींसाठी स्वतंत्र गणवेशाची तरतूद असते. झोपण्यासाठी चादर तसेच जेवणासाठी ताट, वाटी आणि ग्लास प्रशासनाकडून दिले जाते.