Leopard pudhari
नाशिक

Leopard Attack | देवळाली कॅम्प हादरले! संसरी गावात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीत कैद झाला पाळीव कुत्र्यावरील थरारक हल्ला

Leopard Attack | संसरी गावातील शेवगेदारणा रोडवर चौधरी मळ्यात महाशिवरात्रीपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

संसरी गावातील शेवगेदारणा रोडवर चौधरी मळ्यात महाशिवरात्रीपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्री विष्णू दगडू गोडसे यांच्या मळ्यातील कुत्र्यावर झडप घालून त्याचा फडशा पाडणारा बिबट्या धोकादायक ठरला आहे.

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. महाशिवरात्रीच्या रात्रीपासून बिबट्याने या परिसरात ठाण मांडले आहे. या परिसरातील आबा दुर्जड यांच्या मळ्यात रात्री बाराच्या सुमारास बिबट्या आल्याने जनावरांनी हंबरडा फोडला होता. नागरिक बाहेर येताच बिबट्या पसार झाला.

मात्र, लागोपाठ दोन दिवस हा बिबट्या रात्री एक ते तीनच्या सुमारास अंकुश जाधव यांच्या मळ्यातील पडवीजवळ घिरट्या घालत असल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे. तसेच संजय गोडसे यांच्या घरालगतच असलेल्या पडवीमध्ये काहीतरी आवाज झाल्याने गोडसे यांनी बाहेर येताच बिबट्या आणि श्वानाची झटापट त्यांना दिसली.

नागरिकांचा आवाज आल्याने बिबट्याने शिकार सोडून पळ काढला. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्या शिकारीच्या शोधात परिसरात फिरत आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता दिनेश विष्णू गोडसे यांचे पाळीव कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने शिकार केली.

ही बाब सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली. येथील मळ्यात गेल्या चार दिवसांपासून दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे तातडीने पिंजरा बसवण्याची मागणी संजय गोडसे, विजय गोडसे, आबा धुरजड, विष्णू गोडसे, अनिल गोडसे आदींनी केली आहे.

ग्रामस्थ - वन विभागात समन्वयाचा अभाव

संसरी गाव हे दारणा किनारी असल्याने या ठिकाणी सातत्याने बिबट्याचे वास्तव्य आहे. ग्रामस्थ ज्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करतात त्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी पिंजरा बसविला जातो.

त्यातही पिंजऱ्याची स्वच्छता न केल्यास बिबट्या वासामुळे पिंजऱ्यात शिरत नाही. पिंजऱ्यात बकरा कोणी ठेवायचे यात एकमत होत नाही. कधी कधी कोंबड्या ठेवल्या जातात. त्यामुळे बिबट्या तिकडे फिरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT