देवळा : देवळा येथील शासकीय विश्रामगृहालगत गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी मंगळवारी (दि १) रात्रभर गस्त घेतली.
देवळा नाशिक रस्त्यावर गुंजाळनगर शिवारात शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूला असलेल्या शेतात बिबट्या आढळून आला असून त्याचा या परिसरात वावर वाढला आहे. हा बिबट्या रोज सांयकाळी विश्रामगृहाच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या ठिकाणी येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यामुळे विश्रामगृहावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी याची कल्पना वनविभागाला कळविल्यानंतर याठिकाणी मंगळवारी रात्रभर कर्मचाऱ्यांनी बिबट्याला शोधण्यासाठी ग्रस्त घातली. बिबट्याच्या दहशतीने आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले आहेत.बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत नागरिकांनी रात्रीच्या वेळेत घराबाहेर पडू नये, शाळेत व क्लासला या परिसरातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले. वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील पोलीस पाटील योगेश गुंजाळ, माजी उपसरपंच विनोद आहेर यांनी केली आहे .