

नाशिक : रविवार कारंजा येथील नगरपालिकाकालिन यशवंत मंडईच्या धोकेदायक इमारतीच्या पाडकामास अखेर सुरूवात करण्यात आली आहे. सदर परिसर बाजारपेठेचा भाग असल्याने हळूहळू इमारतीचा एक-एक भाग उतरविला जाणार आहे. त्यामुळे इमारत जमिनदोस्त करण्यासाठी तब्बल तीन महिन्यांची मुदत पाडकाम करणार्या ठेकेदारास देण्यात आली आहे.
यशवंत मंडईची इमारत 55 वर्षांपासून उभी होती. सदर इमारत धोकेदायक बनल्याने ती पाडून त्याजागी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा मूळ प्रस्ताव होता. इमारतीच्या पाडकामानंतर महापालिका या वाहनतळाबाबत काय निर्णय घेते, हे अद्याप निश्चित नसले तरी स्ट्रक्चरल आॉडीटच्या अहवालात इमारत धोकेदायक असल्याचे आढळून आल्यानंतर जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी इमारत उतरवून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. इमारतीतील भाडेकरूंनी सुरूवातीला यास मोठा विरोध दर्शवित पालिकेच्या कार्यवाहीविरोधात न्यायालयीन लढा दिला. जिल्हा न्यायालयाने भाडेकरूनंचा वाद फेटाळून लावल्यानंतर उच्च न्यायालयातही हा वाद गेला. उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या इमारत पाडण्याच्या कारवाईला वैध ठरविल्याने इमारतीच्या पाडकामासाठी ठेकेदार नियुक्त करत महापालिकेने 27 जूनला कार्यारंभ आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवार(दि.1)पासून ठेकेदाराच्या कर्मचार्यांमार्फत इमारतीच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली.
इमारतीच्या पाडकामाला भाडेकरूंकडून अडथळा होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने सदर कामाच्या परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. पोलिस बंदोबस्तात इमारतीच्या पाडकामाची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.