देवळाली कॅम्प (नाशिक) : लॅमरोड येथील हॉटेल लोटसमागील विद्या विकास मंदिर शाळेच्या आवारात पहाटेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून वनविभागाकडून या ठिकाणी पिंजरा लावण्याची कार्यवाही सुरू आहे.
वडनेर दुमाला येथे दोन दिवसांपूर्वी दोन वर्षाच्या बालकाचा बळी घेणारा बिबट्या मोकाट असतानाच आता लँमरोड परिसरात बिबट्याचे आगमन झाले आहे. येथील शाळेजवळ बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
महालक्ष्मी रोडवर बिबट्याचे दर्शन
गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करणार्या बिबट्याला शेतकऱ्यांनी आरडाओरड करून दगड मारून पळवून लावले. रामनाथ हांडोरे हे महालक्ष्मी मंदिर जवळच असलेल्या मुल्ला कंपाऊंड परिसरात सकाळी सोडलेल्या गायी घरी घेऊन जाण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या जवळ बिबट्या अलगदपणे जात असल्याचे जवळच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी बघितले. यानंतर त्यांनी एकच आरडाओरडा करून सापडतील ते दगडं घेऊन बिबट्याच्या दिशेने फेकायला सुरवात केली. परिणामी, बिबट्याने येथून धूम ठोकली. मुल्ला कंपाऊंडचा मागील भाग थेट वडनेर रोड कडे जाणाऱ्या मळे परिसराला जोडला जातो. मळ्यात राहणाऱ्या अनेकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून वनविभागाने वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी सोमनाथ कोठूळे, मनिष हांडोरे, हरी हांडोरे, मिननाथ हांडोरे, विलास हांडोरे आदींनी केली आहे.