पंचाळे : मेंढी रोडवर बिबट्या शोध मोहिमेत सहायक वनसंरक्षक वाघेरे यांच्यासह वनकर्मचारी. Pudhari News Network
नाशिक

Leopard News : बिबट्याचा लपंडाव अन् ‘सर्च ऑपरेशन’ सुरूच

मका, उसात अन् शेताबांधावर 60 वनकर्मचार्‍यांची तीन पथके

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर (नाशिक) : तालुक्यातील पंचाळे, खडांगळी, मेंढी आणि निमगाव - देवपूर अशा चार गावांची हद्द असलेल्या डांबर नाला परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा मृत्यू, तर एक जखमी झाला. त्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा तीव्र उद्रेक झाला असून, वनविभागाकडून शोधमोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.

रविवारी (दि. 14) इगतपुरी, संगमनेर व सिन्नर या तिन्ही वनपरिक्षेत्रांतील 60 कर्मचारी मिळून तीन पथकांध्ये विभागणी करण्यात आली आहे. गस्त तसेच बिबट्याचा शोध सुरू असून, सोमवारी (दि. 15) दिवसभर बिबट्याचा उसातून मकात असा लपंडाव सुरू होता. या मोहिमेसाठी इगतपुरी वनपरिक्षेत्रातील 32, संगमनेर येथील 7 आणि सिन्नर येथील 21 कर्मचारी अशा एकूण 60 कर्मचार्‍यांची टीम कार्यरत आहे. पगमार्क (पायाचे ठसे) च्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा घेऊन त्याला ट्रॅन्क्विलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

बिबट्याच्या हालचाली कोणत्या दिशेने होत आहेत, याचा अभ्यास करून, तो मका किंवा उसाच्या शेतात लपल्यास शोध घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जातो. मोहिमेला सहायक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली गती देण्यात आली आहे. यात आधुनिक साधनांचा वापरही केला जात असल्याची माहिती सिन्नर वनपरिक्षेत्राचे अधिकारी हर्षल पारेकर यांनी दिली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सावर्डेकर यांनी सायंकाळी खडांगळी - पंचाळे शिवारात घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच वनाधिकार्‍यांना कार्यवाहीसंदर्भात विशेष सूचना केल्या. वनविभागाच्या या संयुक्त मोहिमेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, बिबट्याचा शोध घेऊन परिसर पुन्हा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लांबकाणी शिवारात अर्जुन संपत कोकाटे यांच्या शेतात दुपारी 2.30 ते 3 च्या सुमारास बिबट्या येऊन गेल्याचे दिसून आले. या भागात बिबट्याने गोलू शिंगाडे या बालकाला उचलून नेले होते. येथे पिंजरा लावण्यात आलेला आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर बिबट्याचे ठसे आढळून आले. तत्पूर्वी जवळच मकाच्या शेतातून उसात आणि उसातून मकात असा बिबट्याचा लपंडाव सुरू होता. पकडण्यासाठी लावलेल्या जाळीवरूनही बिबट्याने उडी मारून पळ काढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सिन्नर : थर्मल ड्रोनच्या साहाय्याने परिसराची पाहणी करताना वन विभागाचे कर्मचारी.

थर्मल ड्रोनच्या साहाय्याने परिसर स्कॅन करणार

या सर्च ऑपरेशनमध्ये दोन थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याच्या हालचाली टिपल्या जाणार असून, एका स्पॉटवरून पाच ते सहा किलोमीटर अंतराचा परिसर स्कॅन केला जाणार आहे. त्यामुळे बिबट्याच्या अचूक ठिकाणाचा अंदाज घेऊन त्याला सुरक्षितरीत्या पकडण्यास मदत होणार असल्याचे हर्षल पारेकर यांनी सांगितले

बिबट्याच्या हल्ल्यातून महिला बचावली

या भागातील भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. जितेश शिंगाडे या बालकाचा मृत्यू झालेल्या घटनास्थळापासून काही अंतरावर खडांगळी मेंढी शिवारातील बाळासाहेब गिते यांच्या घराजवळ बिबट्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गिते यांच्या स्नुषा वैशाली प्रभाकर गिते (24) धुणे धुत असताना अचानक बिबट्याने झडप घातली, मात्र त्या थोडक्यात बचावल्या. या घटनेतून बिबट्या अद्यापही परिसरात मुक्तपणे फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT