नाशिक: वडनेर परिसरातील दोन चिमुकल्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बिबट्याला ठार करण्याची परवानगी नागपूर वन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे त्या संबंधित कारवाई त्वरित सुरू करण्यात येणार आहे.
वनविभागाचे पश्चिम संपूर्ण पथक वडनेर परिसरात बिबट्यांचा शोध घेत आहे एकूण १८० हून अधिक अधिकारी कर्मचारी व लष्कराचे जवान यामुळे या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहे. नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर व सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांचे पथक दिवस रात्र या नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहे.
बिबट्याने मुलाला राहत्या घरातून वडिलांसमक्ष घेऊन गेल्यामुळे भविष्यात अशा प्रकारे बिबट्या पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेला कारणीभूत असलेला बिबट्या सदर क्षेत्रामध्ये आढळून आला आहे. नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्याकडून बिबट्या जेरबंद करणे, त्याला बेशुद्ध करून पकडणे अथवा दोन्ही शक्य नसल्यास त्याला ठार करण्याची परवानगी मिळावी, असे वन विभागाने नागपूरच्या मुख्य कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. त्यानुसार मुख्य कार्यालयाने नरभक्षक बिबट्या ठार करण्यासाठी परवानगी दिली आहे.
बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न
नाशिक : श्रुतीक गंगाधर या दोन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या गंभीर प्रकारानंतर वनविभागाने सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र बिबट्यांचा शोध घेत आहेत. या परिसरातील शेवटचा बिबट्या पकडला जात नाहीत, तोपर्यंत शोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
श्रुतीक गंगाधर या दोन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. वनविभागाच्या कार्यालयामध्ये गुरुवारी (दि. २५) नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांना बिबट्याच्या प्रतिकृती भेट दिल्या होत्या. चार दिवसांत बिबटे न पकडल्यास जिवंत बिबटे पकडून वनविभागाच्या कार्यालयात सोडण्याचा इशाराही दिला होता. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन वनविभागाने बिबट्या पकडण्याचे नियोजन सुरू केले आहे. ही मोहीम नाशिक पश्चिमचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सहायक वनसंरक्षक प्रशांत खैरनार व वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शोध मोहिमेत
अधिकारी-कर्मचारी- ९०
एकूण पिंजरे- १८
ट्रॅप कॅमेरे- १५
थर्मल ड्रोन- २
बेशुद्धीसाठी गन- २
सहभागी पथक असे...
नाशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राणी बचाव पथक.
रेस्क्यू नाशिक डिव्हिजन
संगमनेर रेस्क्यू टीम
डब्लूसीएस इंडिया टीम
फिरते पथक, नाशिक, वणी, पेठ
पश्चिम नाशिक वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी
आर्टिलरी सेंटर, नाशिक यांचे अधिकारी व जवान
वनविभागाचा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ; बछड्यांसह मादीचे दर्शन
निमगाव-देवपूरकर दहशतीत; जेरबंद करण्याची मागणी
सिन्नर (नाशिक) : निमगाव- देवपूर शिवारात मादी बिबट्यासह बछड्यांचे दर्शन घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता. त्यानंतर वनविभागाने नरभक्षक बिबट्या पकडल्याचा दावा केला होता. मात्र शनिवार (दि. 27) सायंकाळच्या सुमारास मक्याच्या शेतात मादी व बछड्यांचे दर्शन झाल्याने वन विभागाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनविभागाने नरभक्षक बिबट्या पकडल्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली आणि शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घातला. नरभक्षक बिबट्या जर पकडला असेल तर गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन कसे घडते? आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
पंचाळे, खडांगळी, मेंढी, चोंडी या परिसरात रोज बिबट्यांचे दर्शन घडत आहे. शेतकरी शेतीकडे पाऊल टाकतानाही जीव मुठीत धरतात. तरीही वनविभागातील अधिकारी निव्वळ कागदोपत्री कारवाई दाखवत असल्याचा आरोप होत आहे. अर्जुन कोकाटे यांच्या शेतात मका सोंगनीचे काम सुरू असताना अचानक जवळच असलेल्या कांद्याच्या शेतातून मादी बिबट्या बछड्यांसह मकाच्या शेतात जाताना दिसली. कोकाटे यांनीच मोबाइलमध्ये मादीसह बछड्यांचा फोटो काढला व अन्य शेतकऱ्यांना सतर्क केले. सर्वात संतापजनक बाब म्हणजे शेतकऱ्यांनी सतत केलेली पिंजरे ठेवण्याची मागणी धुडकावून, विभागाने पिंजरे उचलून नेले. बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असताना पिंजरे काढून नेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या सुरक्षेची उघडपणे थट्टा असल्याचेही मत व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने प्रभावी उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक होईल, असा इशारा अर्जुन कोकाटे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
मका वाया जाईल, ऊस पेटवून द्यावा लागेल...
काही दिवसांत ऊस तोडणी सुरू होणार आहे व सध्या मका सोंगनीला सुरुवात झाली आहे. मजुरांची भीती वाढल्याने शेती कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त झाला नाही, तर आम्हाला ऊस पेटवावा लागेल, मका शेतात वाया जाऊ द्यावा लागेल, अशी हतबल प्रतिक्रिया शेतकरी अर्जुन कोकाटे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.