सिन्नर ( नाशिक ) : तालुक्यातील देवपूर शिवारात तीन ते चार वर्ष वयाचा नर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे शेतीकाम करणे अवघड झाले होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होताच वनविभागाने पिंजरा लावला होता.
संतोष पांडुरंग जगताप यांच्या गट क्रमांक १६९ मधील मक्याच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. शनिवारी (दि. २०) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याच्या डरकाळ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली.
सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी कल्पना वाघेरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक संतोष चव्हाण तसेच वन्यजीव बचाव पथकातील रोहित लोणारे, निखिल वैद्य व मधुकर शिंदे यांनी बिबट्याला सुरक्षितरीत्या मोहदरी वनोद्यानात हलविले. विशेष म्हणजे, वर्षभरात पिंजऱ्यात अडकलेला हा २९ वा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिली. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अनावश्यकरीत्या घराबाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.