Deola Leopard Sightings Pudhari
नाशिक

Nashik Leopard Attack | बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

खर्डे परिसरातील वडाळा शिवारात भीतीचे वातावरण, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Deola Leopard Sightings

देवळा : खर्डे परिसरातील वडाळा शिवारात मंगळवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाभण शेळी ठार झाली. याच रात्री खर्डे येथील कणकापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरातही बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. एकाच रात्री दोन शेळ्या ठार झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडाळा शिवारात शेतकरी श्रावण देवराम सूर्यवंशी यांच्या घरालगत असलेल्या शेडमध्ये शेळ्या व इतर जनावरे बांधण्यात आली होती. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने शेडमध्ये घुसून एका शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाभण शेळी जागीच ठार झाली. सूर्यवंशी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनरक्षक नामदेव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता त्याचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, खर्डे येथील कणकापूर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात शेतकरी रतन पोपट जाधव यांच्या मालकीच्या शेळीवरही बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची माहिती वनरक्षक गोपाळ साबळे यांनी दिली. या घटनेचाही वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

खर्डे व परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने पाळीव जनावरांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT