दिंडोरीः पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील ओझे येथे रविवारी (दि. १७) सायंकाळी ७ च्या सुमारास हरीश निगळ यांच्या वालवडीच्या शेतात मेंढपाळ अजय गोयकर हे मेंढ्यांना वालवड तोडण्यास गेले असता, त्यांच्यावर मागून हल्ला करून बिबट्याने जखमी केले. जखमी अजय यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
ओझे परिसरात दोन दिवसांत बिबट्याने दुसरा हल्ला केल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मेंढपाळ अजय गोयकर व तुळशीराम सूळ हे दोघे मेंढ्यांना चारा आण्यासाठी ओझे येथील निगळ यांच्या शेतात गट क्रमांक १०५ मध्ये वालवडीचा चारा घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी काही वेळातच बिबट्याने गोयकर यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यावेळी त्यांनी जोरात आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. या हल्ल्यात गोयकर हे जखमी झाले. त्यांना दिंडोरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे काही लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओझे परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना सावधगिरी बाळगावी. वनविभागाने या परिसरात बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत गावागावात जाऊन प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रमाणात बिबट्यांचे होणारे हल्ले रोखता येतील किंवा नागरिकांना बिबट्यांपासून बचाव करता येईल.