चांदवड : पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील खडकओझर गावात सोमवारी (दि. ९) रात्री विवट्यांच्या जोडीने दोन शेतकऱ्यांवर अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात दोन्ही शेतकरी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
खडकओझर येथील शेतकरी नंदू व बबन मोतीराम पगार हे शेतात गहू पिकाला पाणी देत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यांच्या जोडीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही शेतकऱ्यांच्या हात, पोट व पाठीच्या भागावर पंजे व दातांनी गंभीर जखमा झाल्या असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
झटापटीदरम्यान शेतकऱ्यांचा मोबाइल शेतात पडला. तो उचलण्यासाठी ते परत जात असतानाच, त्याच शेतात दबा धरून बसलेल्या दुसऱ्या बिबट्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे.
आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा करत बिबट्यांना पिटाळून लावले. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर असल्याच्या चर्चेला या घटनेमुळे प्रत्यक्ष दुजोरा मिळाला आहे. जखमी शेतकऱ्यांना तत्काळ वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र, तेथे आवश्यक प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल वाल्मीक व्हरगळ, वनरक्षक चंद्रकांत मार्गे पाड, किशोर मोहिते, वनमजूर वसंत देवरे, तसेच भारत वाघ व अशोक शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वन विभागाच्या वतीने जखमींना उपचारासाठी मदत करण्यात आली असून, परिसरात बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील शेतकऱ्यांचे कुत्रे बिबट्यांचे भक्ष्य ठरत होते.
आता थेट माणसांवरच हल्ले होऊ लागल्याने खडकओझर, वडनेर भैरव, शिरवाडे, वणी, खंडाळवाडी व पिंपळणारे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामावरही मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.