नाशिक : बिबट्या आला, पळा पळा... त्या अपार्टमेंटमध्ये शिरला... पळाला पळाला... पकडा पकडा... अशा तब्बल तीन तासांच्या थरारानंतर बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने सात जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. महात्मानगर, कामगारनगर व संत कबीरनगरलगत असलेल्या अतिशय वर्दळीच्या पारिजातनगर, वनविहार, गुंरुकुल, गुरुप्रसाद आणि गंगासागर कॉलनीत दुपारी २.४५ वाजेपासून ते सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत हा थरार रंगला. पोलिसांचा मोठा फौजफाटा व वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद केला गेला.
शहरात बिबट्या येणे ही बाब काही नवी राहिली नसली तरी, महात्मानगर, संत कबीरनगर, कामगारनगर सारख्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली. पारिजातनगर परिसरातील गुरुकुल हायस्कूल येथे बिबट्या असल्याचे सर्वप्रथम शारदा साबळे या महिलेच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याचा थरार सुरू झाला. या कॉलनीतून त्या काॅलनीत, या अपार्टमेंटमधून त्या अपार्टमेंटमध्ये उड्या मारत बिबट्याने तब्बल तीन तास दहशत निर्माण केली होती.
नागरिकांनी घरात कोंडून घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. वनविभागाची रेस्क्यू टीम, पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत बिबट्याचा माग काढला. जलसंपदा मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी धाव घेत, मदतकार्यात सहभाग घेतला. प्रारंभी दोन बिबटे असल्याची चर्चा असल्याने, त्या अनुषंगाने तपास सुरू केला. मात्र, एक बिबट्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्याची चर्चा असून, दुसरा नागरीवस्तीतच दबा धरून बसला होता. अखेर वनविभागाच्या विशेष रेस्क्यू पथकाने थरारकपणे डार्ट मारून त्यास जेरबंद केले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या पकडण्यात यश आल्याने, सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
बिबट्याचा असा रंगला थरार
पारिजातनगरलगत असलेल्या गुरूकुल कॉलनीतील गुरुकुल हायस्कुललगत असलेल्या साबळे यांच्या दारात दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी बिबट्या बसला असल्याचे शारदा साबळे यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने गेटवरून उडी घेत, गंगासागर सोसायटीत प्रवेश केला. सोसायटीलगत बंद अवस्थेत असलेल्या दीक्षित यांच्या बंगल्यात बिबट्या शिरला. तत्पूर्वी घरात असलेले शारदा साबळे यांचे पती विठ्ठल साबळे यांनी पत्नीचा ओरडण्याचा आवाज एेकूण घराबाहेर आले. त्यानंतर कॉलनीत बिबट्या शिरल्याची एकच बोंब झाली. त्यामुळे बिथरलेला बिबट्या किशन लोहार यांच्या घरात शिरला. ते घरात झोपलेले होते. अशात बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत हल्ला केला. त्यांनी आरडाओरड करीत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. तेथून बिबट्या शिवलोक अपार्टमेंटमध्ये शिरला. तोपर्यंत मोठी गर्दी झाल्याने, बिबट्या चांगलाच बिथरला. त्याने तेथून पळ काढत माजी नगरसेविका हिमगौरी आडके यांच्या जेम्स स्कुलमध्ये धडक दिली. तेथून गुरुप्रसाद कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आशा पानटपरी येथे पळ काढला. चक्क बिबट्या समोर आल्याने, नागरिकांची तेथून एकच पळापळ झाली. त्यानंतर बिबट्या सायली बंगल्यात शिरला. तेथूनच जवळ असलेल्या कामगारनगर लगतच्या महापालिकेच्या शाळा क्रमांक १७ मध्ये त्याने उडी घेतली. तेव्हा शाळेत लहान मुले होती. तेथे नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तारामंगल अपार्टमेंटच्या बी-विंगमध्ये शिरला. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारावर जाळी लावली. मात्र, जाळीला धडक देत बिबट्याने संत कबीर नगरलगत असलेल्या पाटाच्या रस्त्यावरील नाल्यात भिंतीवरून झेप घेतली. मात्र, तोपर्यंत रेस्क्यु पथकाला त्याला डार्ट मारण्यात यश आले होते. अखेर बिबट्याला सायंकाळी ५.४० वाजता जेरबंद केले गेले.
दाेन वनरक्षकांसह सात जणांवर हल्ला
बिबट्याने तीन तास धुमाकुळ घालताना तब्बल सात जणांवर जीवघेणा हल्ला केला. यात वनरक्षक संतोष बोडके व प्रवीण गोलाईत गंभीर जखमी झाले. याशिवाय ६५ वर्षीय बबन शिंदे, ४६ वर्षीय रंगनाथ महादू डाबल, २२ वर्षीय हॉटेल कामगार तुषार रामदास आचारी, किशन लोहार यांच्यासह एकावर झडप घालत हल्ला केला. सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय आणि श्रीगुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मंत्री गिरीश महाजन थेट मदतकार्यात
भरवस्तीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत, मदतकार्यात सहभाग नोंदविला. त्यांनी पोलिस पथक तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीमसाेबत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मदत केली. जेव्हा बिबट्या तारामंगल अपार्टमेंटच्या बी-विंगमध्ये शिरला होता, तेव्हा रेस्क्यू पथकाने अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारासमोर जाळे लावले होते. त्यावेळी मंत्री महाजन यांनी प्रवेशद्वारासमोर उभे राहून रेस्क्यू टीमला मदत केली. बिबट्याने जाळे भेदून कंपाऊंडच्या भिंतीवरून उडी मारून कॅनाल रस्त्यावरील नाले भागात घनदाट झुडपांच्या दिशेने पळ काढला, तेव्हा देखील मंत्री महाजन यांनी बिबट्याच्या मागे धाव घेतली. बिबट्याला डार्ट मारलेला असल्याने, रेस्क्यू टीमने त्याचा पाठलाग केला. तेव्हा मंत्री महाजन यांनी देखील टीमसोबत बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. कंपाऊडच्या भिंतीवर बसून त्यांनी रेस्क्यू टीमला सूचना केल्या.
बघ्याची गर्दी अन् पोलिसांचा दंडूका
बिबट्या आल्याने, परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या आला रे आला अशी बोंब उठवून दिली जात असल्याने, एकच पळापळ होत होती. त्यामुळे रेस्क्यू कार्यात मोठा अडथळा निर्माण होत होता. अशात सातपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे व त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघ्यांची गर्दी वाढूच लागल्याने, पोलिसांना किरकोळ दंडूका चालवावा लागला. त्यानंतर पोलिस उपायुक्त किशोर काळे, गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सरकाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात भाग घेतला. यावेळी बघ्यांना आवरण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते.
या मार्गे बिबट्या शिरल्याचा अंदाज
कामगार नगर, संत कबीरनगर हा अत्यंत वर्दळीचा परिसर असून, याभागात बिबट्या कसा शिरू शकतो? अशी चर्चा रंगली होती. अशात सावरकर नगर, आनंदवली नगर लगत असलेल्या गोदावरी नदी परिसरातून तो कॅनाल रोडमार्गे पारिजातनगर परिसरात शिरला असावा, असा अंदाज आहे. संत कबीरनगर ते मोतीवाला मेडिकल कॉलेजपर्यंत कॅनाल रोड असून, या रस्त्याच्याकडेला बऱ्यापैकी झाडे झुडपे आहेत. त्या मार्गी बिबट्या पारिजातनगरपर्यंत पोहोचला असावा, असा अंदाज आहे. अन्यथा गोदावरीतून सावरकरनगरमार्गे भोसलाच्या मागील बाजूने तो कॅनाल रोडवरून पारिजातनगरमध्ये शिरला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. बिबट्याने हा प्रवास रात्रीतूनच केला असावा अशीही चर्चा होती.
जखमी बिबट्या, भरकटल्याचा अंदाज
रात्री किंवा पहाटेतून भरवस्तीत शिरलेला बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले. त्याच्या शेपटीला जखम होती. कॅनाल रोडमार्गे त्याने वस्तीत प्रवेश केला असला तरी, तो वस्तीतच भरकटल्याने त्याला परतता आले नाही. कानेटकर उद्यान परिसरात बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. नुकताच शिवाजीनगर भागात बिबट्या जेरबंद केला. याच गटातील हा बिबट्या वस्तीत येवून भरकटला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
शाळेत बिबट्या; पालकांचा आक्रोश
कामगार नगर परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक १७ मध्ये बिबट्या शिरल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. शाळेत लहानगे विद्यार्थी असल्याने, शिक्षकांनी तत्काळ सर्व दरवाजे बंद केले. तसेच ही बाब पालकांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेत, आक्रोश केला. आपल्या पाल्यांना तत्काळ सुरक्षितपणे ते घरी घेवून गेले. शिक्षकही प्रचंड घाबरले होते.
आमदार, माजी नगरसेवकांची धाव
मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे समजातच राजकारणी मंडळी घटनास्थळी पोहोचले. आमदार सीमा हिरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, हिमगौरी आडके, रश्मी बेंडाळे-हिरे, अॅड. महेश शिंदे आदींनी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.
जखमींची नावे अशी
बबन बाजीराव शिंदे (वय-६५)
रंगनाथ महादू दाबल (वय-४९)
तुषार रामदास आचारी (वय-२२)
श्रद्धा विठ्ठल साबळे (वय - ३५)
किसन सुखराम लोहार (वय-३६)
संतोष कमालकर बोडके (वनरक्षक)
प्रविण साहेबराव गोलाईत (वनरक्षक)
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेटमध्ये यावर गहन चर्चा झाली आहे. माझ्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभाग येत असल्याने, बिबट्यांची जबाबदारी माझ्याकडे साेपवावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागेल, पिंजरे वाढवावे लागतील. तसेच बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता, नसबंदीचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. त्याचाही विचार सुरू आहे. याशिवाय बिबट्यांना सुरक्षितस्थळी नेण्याचे तसेच वनतारा येथे सोडण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जे लोक जखमी झाले त्यांना नियमानुसार मदत केली जाईल.गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री