नाशिक : जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे काँग्रेसकडूनच विधानसभेची निवडणूक लढविणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भेट घेतल्यानंतर त्र्यंबकेश्वर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत सकाळे यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर पक्षविरोधी भुमिका घेतल्याचा ठपका ठेवत कारवाई होण्याची टांगती तलवार आहे. तसेच महायुतीचे घटकपक्ष असलेल्या अजित पवार गटाने देखील वेळोवेळी आ. खोसकर हे आपलेच असल्याचे सांगितले असल्याने आ.खोसकरांबद्दल काँग्रेसचे हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच गेल्याच महिन्यात आ.खोसकरांचे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणे असो, भुजबळ फार्मवर जाऊन मंत्री भुजबळांशी चर्चा करणे असो या सर्व बाबींमुळे ते नक्की कोणाचे या चर्चा होत होत्या.
काँग्रेसचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संपत सकाळे तसेच इगतपुरीचे जनार्दन माळी यांनी नागपूर येथे जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. मतदारसंघातील वस्तुस्थिती सांगितल्यानंतर पटोले यांनी तयारी सुरु करण्याचे सांगितले आहे. त्यामुळे रोज होणाऱ्या चर्चांना आता पुर्णविराम मिळाला आहे. याबाबत दैनिक पुढारी सोबत बोलताना आ.खोसकर यांनी सांगितले की, काँग्रेकडून आमदार झालो. विकासकामे करता आली. स्वत: जनतेपर्यंत पोहोचल्याने जनतेने मला विधानसभेमध्ये पोहोचवले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेसाठी काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलावून घेतले होते. त्यामुळे आम्ही त्यांना भेटलो. मतदारसंघाची पदाधिकारी, कार्यकर्ते बांधणी कशी आहे यावर चर्चा झाली. इच्छुकांपैकी आ.खोसकरांंचे नाव सर्वात वरती आहे. ते निवडून येतील अशी परिस्थिती असल्याची माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी काम करा, असे सांगितले आहे.संपत सकाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक.