

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खोसकर हे आपलेच कार्यकर्ते असल्याचे सांगत गेल्या निवडणुकीवेळी इगतपुरीची जागा काँग्रेसकडे असल्याने त्यांनी तिकडे प्रवेश करून विजय मिळवला होता, असे सांगितले आहे. त्यामुळे आमदार खोसकरांच्या पक्ष प्रवेशाला पृष्टी मिळाली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शुक्रवारी (दि ३०) झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधील इगतपुरी- त्र्यंबकेश्वरची जागेवर आपला दावा सांगितला. तसेच तेथे सध्या असलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे आपलेच आमदार असल्याचे सांगितले होते. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हिरामण खोसकर आमचे कार्यकर्ते आहे. ती जागा काँग्रेसची होती. म्हणून त्यांना तिकडे तिकीट देऊन निवडून आणलं होतं. तिथे आता काय परिस्थिती हे माहीत नाही आणि माहिती असली तरी सांगणार नाही, असं ते म्हणाले.
आमदार खोसकर हे नेहमीच चर्चेतील आमदार आहेत. महाविकास आघाडीमध्ये असले तरी त्यांचा संपर्क महायुतीच्या नेत्यांशी होत असतो. कधी मुख्यमंत्र्यांसोबत, कधी गिरीश महाजनांसोबत, तर कधी भुजबळ फार्मवर त्यांचा वावर असतो. विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून क्रॉस वोटिंग केल्यामुळे काॅंग्रेसकडून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.