लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभावावर दबाव निर्माण झाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांची घसरण झाली असून, ५ हजार ७०० रुपयांवरून दर ५ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
जुन्या उन्हाळी कांद्याच्या कमाल दरातही १४४ रुपयांची घसरण होऊन दर ४ हजार ५३५ रुपयांवरून ४ हजार ३९१ रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
लासलगाव बाजार समितीत गुरुवारी लाल कांद्याची सुमारे २०० वाहनांतून आवक झाली. या कांद्याला कमाल ५ हजार ४०० रुपये, किमान १ हजार ८५२ रुपये, तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
दुसरीकडे जुन्या उन्हाळी कांद्याची ११५ वाहनांतून आवक झाली. उन्हाळी कांद्याला कमाल ४ हजार ३९१ रुपये, किमान १ हजार ५०० रुपये, तर सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
नवीन लाल कांद्याची बाजारातील आवक वाढू लागल्याने दरात नरमाईचे संकेत मिळत आहेत. त्यात जुन्या उन्हाळी कांद्याच्या दरातही घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बाजारातील आवक, मागणी आणि दरातील चढ-उतार यामुळे आगामी दिवसांत कांद्याचे बाजारभाव कोणत्या दिशेने जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.