Onion Export  Pudhari File Photo
नाशिक

Lasalgaon Onion | 'कांदा विक्रीची घाई करू नका!'

Lasalgaon Onion | ऑक्टोबरनंतर कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता; टप्प्याटप्प्याने विक्री करण्याचा संघटनेचा शेतकऱ्यांना सल्ला

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असून, आगामी काळात कांद्याचे दर आणखी मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राखीव कांदा दिल्ली, चेन्नईसह प्रमुख महानगरांमध्ये पाठवून बाजारातील पुरवठा वाढवला होता.

त्याचा परिणाम म्हणून मागील सप्ताहात कांद्याच्या घाऊक दरात क्विंटलमागे तब्बल ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र, सरकारी हस्तक्षेपाचा परिणाम अल्पकाळ टिकला असून, चालू सप्ताहात कांद्याचे दर पुन्हा वाढले आहेत.
केंद्र सरकारने राखीव साठ्यातील कांदा ३५ रुपये किलो दराने महानगरांमध्ये उपलब्ध करून दिला. त्यामुळे बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरावर दबाव निर्माण झाला. मात्र, यंदा केंद्र सरकारकडे राखीव कांद्याचा साठा कमी असल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात सरकारी कांदा बाजारात आणणे शक्य होईलच असे नाही.

चाळींत 40 टक्केच साठा शिल्लक

नाशिक जिल्ह्यात चाळींत साठवलेल्या उन्हाळ कांद्यापैकी ६० ते ६५ टक्के कांदा विकला गेला असून, सुमारे ४० टक्के साठा शिल्लक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातच पावसामुळे चाळीत साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता खालावत असल्याने काही कांदा खराब होत आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष बाजारासाठी उपलब्ध होणारा कांद्याचा साठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचा उपलब्ध साठा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर नवीन कांद्याची आवक अपेक्षित प्रमाणात झाली नाही, तर बाजारात कांद्याची उपलब्धता कमी होऊन दर वाढण्याची शक्यता आहे.

खरीप आणि रांगडा कांद्याला अच्छे दिन?

नवीन खरीप तसेच रांगडा कांद्याच्या बाजारातील आवकेला विलंब होण्याची शक्यता असल्याने आगामी हंगामातील कांद्याला चांगला दर मिळण्याची शक्यता बाजारातील जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी केवळ दराच्या अपेक्षेवर अवलंबून न राहता दर्जादार उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दर साडेचार हजारांच्या पुढे; पुढील दीड महिना निर्णायक

सध्या कांद्याच्या दराने पुन्हा साडेचार हजारांचा टप्पा गाठला असताना, चाळीतील घटता साठा, खराब होणारा कांदा आणि खरीप कांद्याच्या लागवडीला झालेला विलंब या तीन घटकांमुळे आगामी एक ते दीड महिना कांदा बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणावा

या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना कांदा विक्रीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध कांद्याचा साठा आणि बाजारातील आवक लक्षात घेऊन नियोजनबद्ध विक्री करावी. संपूर्ण कांदा एकाच वेळी बाजारात आणण्याऐवजी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी, असा सल्ला संघटनेने दिला आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत आणून लिलावाच्या माध्यमातून विक्री करावी, असा सल्लाही संघटनेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT