लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठांमध्ये दराच्या घसरणीचे सत्र सुरू असून, अवघ्या आठ दिवसांत लाल कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल एक हजार ७५० रुपयांची घसरण झाली आहे. वाढती आवक, निर्यातीतील मंदी आणि पाकिस्तानच्या कांद्याचे तुलनेने कमी दर यांमुळे भारतीय कांद्याला निर्यात बाजारपेठेत स्पर्धेचा सामना करावा लागत असून, त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
पाकिस्तानमध्ये कांद्याची मुबलक उपलब्धता असून, तेथील कांद्याचे दर भारतीय कांद्याच्या तुलनेत किलोमागे सुमारे १० ते १५ रुपये कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांद्याला तुलनेने अधिक मागणी मिळत असून, भारतीय कांद्याच्या निर्यातीवर दबाव निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, युद्धजन्य परिस्थितीमुळे वातानुकूलित कंटेनरची उपलब्धता कमी झाल्याने कांदा निर्यातीच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. कंटेनरचा तुटवडा आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे निर्यातीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यापर्यंत दररोज २० ते २५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती. मात्र, आता आवक दुप्पट होऊन ५० हजार क्विंटलवर आली आहे. निर्यात मंदावणे आणि वाढती आवक अशा दुहेरी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांद्याच्या दरातील घसरण ही शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. निर्यात मंदावणे, पाकिस्तानी कांद्याची स्पर्धा आणि वाढती आवक यांमुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने निर्यात सुरळीत करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करून, कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.– भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा किलोमागे १० ते १५ रुपये स्वस्त असल्याने परदेशातील खरेदीदार पाकिस्तानी कांद्याला प्राधान्य देत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे वातानुकूलित कंटेनरची उपलब्धता कमी झाली असून, वाहतुकीचा खर्च आणि निर्यात प्रक्रियेतील अडचणी वाढल्या आहेत.– विकास सिंह, उपाध्यक्ष, एचपीईए, नाशिक
पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याचे कारण सांगितले जात असले, तरी भारतीय कांद्याची निर्यात वाढवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाढती आवक आणि घसरते दर यांमुळे उत्पादन खर्चही वसूल होईल की नाही, याची चिंता आहे.– शेखर कदम, कांदा उत्पादक शेतकरी