Nashik Farmers Protest Pudhari
नाशिक

Farmers Protest Nashik | लासलगावात कांद्याचा 'वांदा'! दर 500 रुपयांवर आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद

Farmers Protest Nashik | संतप्त शेतकऱ्यांचे दीड तास आंदोलन; खा. भास्कर भगरे घेणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव बाजार समितीत बुधवारी (दि. २५) कांदा लिलाव सुरू होताच ५०० ते ८०० रुपये दर पुकारण्यात आले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, उपसभापती ललित दरेकर, सचिव नरेंद्र वाढवणे, सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर दीड तासानंतर लिलाव सुरू झाले.

याबाबत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार असल्याची माहिती दिली, लासलगावच्या मुख्य कांदा लिलाव आवारात सकाळी एक हजाराहून अधिक वाहनांतून २० हजार क्विटल कांद्याची आवक झाली होती.

लिलाव सुरू होताच कमी दर पुकारल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव बंद पाडले. दरम्यान, प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत नाशिक येथे होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयावर कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ओतून गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निर्यात खुली करण्याची आमदार आहेर यांची मागणी

चांदवड : यंदा लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने बाजारपेठेत दर कोसळले आहेत. या पार्श्वभूमीवर चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत कांद्याची निर्यात तत्काळ खुली करावी व कमी दराने विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे,

अशी मागणी केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, चांदवड बाजार समितीचे संचालक योगेश ढोमसे, अॅड. शांताराम भवर, राजू पाटील, गणेश महाले उपस्थित होते.

मंगळवारपर्यंत कांद्यास १,२०० ते १,३०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. होळीमुळे चार-पाच दिवस बाजार बंद राहणार असल्याने जादा आवक झाल्याने दर घसरले. रेल्वे रॅक अधिक उपलब्ध व्हावेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्री महाजन व भुजबळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला.
- डी. के. जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती
कांद्यास मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यामुळे प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान द्यावे. तसेच २,५०० ते ३,००० रुपये हमीभावाने खरेदी करावी. अन्यथा शेतकरी आक्रमक होतील.
संजय गवळी, कांदा उत्पादक, नांदूरमध्यमेश्वर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT