लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीभोवती रंगलेले राजकीय नाट्य अद्याप संपण्याचे नाव घेत नसून ११ जुलै रोजी ऐनवेळी निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्यानंतर ६ ऑगस्टला होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिनांक ११ ऑगस्टपर्यंत या निवडीला स्थगिती दिली आहे.
या निवडीला स्थगिती दिल्याने सत्तेच्या सारीपाटावरील मोहरे पुन्हा एकदा जागच्या जागी थांबले आहेत. बाजार समितीच्या सभापतीपदासाठी विविध संचालक गटांकडून दावे केले जात असून, विरोधी गटातील संचालकांनी सोनिया होळकर यांच्या नावाला पाठिंबा दर्शविल्याचा दावा त्यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. तर सत्ताधारी गटाकडून जयदत्त होळकर यांचे नावाला संमती असल्याचे बोलले जात होते.
त्यामुळे सभापतीपदाच्या निवडीसाठी बहुमत कोणाच्या बाजूने आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन याचिका आणि प्रशासकीय आदेशांमुळे आता पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन निर्देश तसेच सहकार व पणन विभागाच्या निर्णयानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया कधी आणि कशी पार पडते याकडे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीला दुसऱ्यांदा स्थगिती मिळाल्याने विरोधी गटाला चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे. विशेषतः 'गेम चेंजर'च्या भूमिकेत असलेल्या सदस्यांचे गणितच बिघडले असून, सभापती-उपसभापती निवडीत निर्णायक ठरण्याची शक्यता असलेल्या या सदस्यांच्या राजकीय अपेक्षांवरही पाणी फेरले गेल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत होती तसतशी प्रत्येक मताचे महत्त्व वाढत होते आणि सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते; मात्र पणनच्या स्थगितीने निवडणुकीलाच ब्रेक लागल्याने इच्छुकांच्या पदरी निराशा आली.
६ ऑगस्टचा निवडणूक कार्यक्रमही प्रशासकीय स्थगितीमुळे पुढे ढकलला गेल्याने 'लासलगाव है तो मुमकिन है!' अशीच चर्चा रंगली असून, येथे शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या संपूर्ण राजकीय पटावर नाना यांनी एक महत्त्वाची चाल खेळल्याची चर्चा असून, विरोधकांच्या डावाला मात्र सध्याच्या घडीला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे चित्र आहे.
निवडणूक पुढे ढकलल्याने दोन्ही गटांना पुन्हा एकदा आपापले गणित मांडण्याची संधी मिळाली असून, पुढील काळात कोण कोणाच्या गोटात जातो, कोणाची नाराजी दूर होते आणि कोणता 'गेम चेंजर' अखेर निर्णायक ठरतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ११ जुलैचा ट्विस्ट, ६ ऑगस्टची न्यायालयीन स्थगिती आणि पडद्यामागे सुरू असलेली राजकीय मोर्चेबांधणी पाहता लासलगाव बाजार समितीची सत्ता सध्या 'कोणाच्या हातात?' या प्रश्नापेक्षा 'पुढची चाल कोणाची?' याचीच उत्सुकता अधिक वाढली आहे.