नाशिक : गोवत्स द्वादशी, धन्वंतरी पूजन, बलिपूजनासोबतच अमावास्येला लक्ष्मीचीही पूजा केली जाते. लक्ष्मीची मुहूर्तावर पूजा करून, जीवनात सुख समृद्धी नित्य वसू दे, अशी प्रार्थना नागरिक करीत असतात. मंगळवारी (दि.२१) घरोघरी, कार्यालयांमध्ये लक्ष्मीपूजनाचे पर्व उजळणार आहे. यानिमित्त रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीने शहरभर उत्साहाचे वातावरण आहे.
भारतीय सण परंपरांमध्ये दीपावली उत्सवास मोठे महत्त्व आहे. दिवाळी संस्कृतीत विविध परंपरांचा समावेश असताना देवदेवतांचीही पूजा केली जाते. मंगळवारी लक्ष्मीपूजन असून, अमावस्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत असली तरी मंगळवारी दिवसभर लक्ष्मीपुजनाचा मुहूर्त आहे. दुकाने, कार्यालये, संस्था आणि कारखान्यांमध्येही मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. नागरिकांनी बाजारात जाऊन लक्ष्मीपूजनाचे सर्व साहित्य खरेदी केले आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीचे रूप म्हणून केरसुणीची पूजा केली जाते. नायलॉन केरसुणी व फड केरसुणी (शिंदीच्या झाडाची) अशा दोन प्रकारच्या केरसुणी बाजारामध्ये विक्रीस उपलब्ध असून, त्याला ग्राहकांची चांगली मागणी होती. लक्ष्मीच्या मूर्तीची किंमत ८० रुपये, तर नायलॉन केरसुणी ८० ते ९० रुपये जोडी व फड केरसुणी ५० ते १२० रुपये जोडी या दराने विकण्यात येत होती. छोट्या आकाराच्या केरसुणीची २० रुपयांपासून विक्री झाली. रस्त्याच्या दुतर्फा विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.
बाजारपेठेत अमाप उत्साह
लक्ष्मीपूजनानिमित्त लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी सोमवारी नागरीकांनी बाजारपेठ गर्दी केली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरांवर आकाशकंदिलांचा मंद प्रकाश आणि जोडीला फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळणार आहे. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी, रामघाट, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड, शालिमार, कॉलेज रोड, गंगापूररोड, सिडको, नाशिकरोड अशा प्रमुख ठिकाणी लाह्या बत्तासे, फुले, हार, लक्ष्मीची मूर्ती, फोटो, पाच फळे आदी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी गेल्या काही दिवसांपासून गर्दी केली होती.
लक्ष्मीपूजन मुहूर्त असा
यंदा २१ ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान गणेश, लक्ष्मी माता, कुबेर देवता यांची पुजा केली जाणार आहे. कार्तिक अमावस्या तिथी मंगळवारी प्रदोष व्यापिनी व निधीश काल् व्यापिनी आहे, त्यामुळे मंगळवारीच लक्ष्मीपुजन सांगितले आहे. या दिवशी सर्वात शुभ मुहूर्त सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत आहे.
अमृत मुहूर्त : सायंकाळी ६.२५ ते ७.५०,
उत्तम मुहूर्त : ९.१५ ते १०.४०,
लाभ मूहूर्त : पहाटे २.५६ ते ४.२१,
अपरान्ह मुहूर्त : पहाटे ३.४४ ते ५.४६,
सर्वोत्तम मूहूर्त : पहाटे ४.२१ ते ५.४६.